देशातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. तर, तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवलेली आहे. दरोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होणाऱ्यांच्या तुलनेत कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. मागील २४ तासांमध्ये करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत, देशात जास्त संख्येने नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. देशात या कालावधीत ४४ हजार ६४३ नवे करोनाबाधित आढळले असून, ४१ हजार ९६ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, ४६४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

आरोग्यमंत्रालया मार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात अ‍ॅक्टीव्ह रूग्णसंख्या ४,१४,१५९ असून, एकूण ३,१०,१५,८४४ रूग्ण करोनातून बरे झालेले आहेत. तसेच, ४९,५३,२७,५९५ जणांचे लसीकरण झालेले आहे.

१३५ देशांत डेल्टाचा कहर; जागतिक रुग्णसंख्या २० कोटींवर

तर, करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार जगातील १३५ देशांमध्ये झाला आहे. हा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात आढळला होता. पुढच्या आठवड्यात जगभरातील करोना रुग्णांची संख्या २० कोटी पार करेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं ३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या साप्ताहिक करोना अपडेटमध्ये म्हटलंय. जागतिक स्तरावर १३२ देशांमध्ये बीटा व्हेरिएंट आणि ८१ देशांमध्ये गामा व्हेरिएंटची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तर, अल्फा व्हेरिएंट १८२ देशांमध्ये पसरला आहे. दरम्यान, २६ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान ४० लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत, असेही अपडेटमध्ये म्हटले आहे.