जगभराबरोबरच भारतामध्येही करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूची दहशत असतानाच करोनाबाधितांच्या आकडेवारीसंदर्भातील एक दिलासादायक बातमी समोर आलीय. भारतामध्ये मागील ५५८ दिवसांमध्ये म्हणजेच मागील दीड वर्षांमध्ये पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्ण आढळून आल्याचं आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटलं आहे.

भारतात सोमवारी ६ हजार ८२२ रुग्ण आढळून आले आहेत. तर सोमवारी दिवसभरात १० हजार चार रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मागील ५५८ दिवसांमध्ये २४ तासांत आढळून आलेली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. २४ तासांमध्ये करोनामुळे २२० जणांचा मृत्यू झालाय. भारतात सध्या ९५ हजार १४ रुग्ण करोनाबाधित असून हा अॅक्टीव्ह केसेसचा लोडही ५५४ दिवसांमधील सर्वात कमी आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंडळाने ही आकडेवारी जारी केल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. त्याचप्रमाणे भारतामधील १२८ कोटी ७६ लाख लोकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सोमवारी देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत शिरकाव केला आहे. मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या २३ वर पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण?
महाराष्ट्राखालोखाल राजस्थानमध्ये नऊ, कर्नाटकमध्ये दोन तर गुजरातमध्ये ओमायक्रॉनबाधित एक रुग्ण आढळून आलाय. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्येही ५ डिसेंबर रोजी एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आलाय.