बांगलादेश आणि भारताच्या संबंधांमध्ये मागील काही वर्षांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान हे काही दिवसांपूर्वी भारताच्या दौऱ्यावर येणार होते. पण अचानक त्यांचा हा दौरा रद्द झाला. त्यानंतर दिल्लीतील ब्रिक्स शिखर परिषदेत तारिक रहमान सहभागी होतील अशा चर्चाही होत्या. मात्र, ब्रिक्स परिषदेलाही ते उपस्थित राहिले नाही.

त्यानंतर बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हुमायूं कबीर यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमंत्रणाबाबत भाष्य करत म्हटलं होतं की, ब्रिक्स परिषदेचं निमंत्रण हे ‘बिम्स्टेक’चं अध्यक्ष म्हणून बांगलादेशला देण्यात आलं होतं. मात्र, पंतप्रधान म्हणून तारिक रहमान यांना दिलं गेलं नव्हतं.

बांगलादेशने केलेल्या या दाव्यानंतर आता भारताने मोठा खुलासा करत बांगलादेशचा खोटेपणा समोर आणला आहे. बांगलादेशचे मंत्री हुमायूं कबीर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘एक नाही, तर दोन निमंत्रणे बांगलादेशला दिले होते’, असं रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

भारताने काय खुलासा केला?

“आम्ही बांगलादेशच्या पंतप्रधानांना द्विपक्षीय दौऱ्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर ‘बिम्स्टेक’चे अध्यक्ष या नात्याने त्यांना ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचं निमंत्रणही देण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना दोन निमंत्रणे मिळाली होती”, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर यांनी म्हटलं आहे.

ब्रिक्स परिषदेनंतर बांगलादेशला उपरती?

बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हुमायूं कबीर यांनी भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत भूमिका मांडली आहे. हुमायूं कबीर म्हणाले की, “आम्हाला नवीन संबंधांच्या दिशेने वाटचाल करायची आहे. हे काम बहुपक्षीय मंचाऐवजी द्विपक्षीय चर्चेद्वारे केलं जावं. भारताबरोबरच्या ‘अति-केंद्रित’ दृष्टिकोनाच्या पलीकडे जाण्याची बांगलादेशला गरज आहे. नवी दिल्लीबरोबरच्या संबंधांकडे संतुलित दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि परस्पर हितांना प्राधान्य दिलं पाहिजे. नवी दिल्लीसोबतचे संबंध हा बांगलादेशच्या इतर देशांशी असलेल्या व्यापक संबंधांचाच एक भाग आहे. भारत हा केवळ एक देश आहे आणि बांगलादेशाला त्याच्याशी चांगले द्विपक्षीय संबंध हवे आहेत.”

भारत-बांगलादेशात तणाव का निर्माण झाला?

बांगलादेशात ऑगस्ट २०२४ मध्ये तरुणांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनानंतर शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतलेला आहे. शेख हसीना यांना नवी दिल्लीने आश्रय दिल्यामुळे भारत-बांगलादेश संबंधांत तणाव निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.