इराणबरोबर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी विविध देशांनी आपापल्या युद्धनौका पाठवाव्यात, असे आवाहन केले आहे . ट्रम्प यांच्या या आवाहनानंतर भारताने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांच्या सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी नौदलाची जहाजे तैनात करण्याबाबत भारताने अमेरिकेबरोबर कोणतीही द्विपक्षीय चर्चा केलेली नाही, अशी माहिती सोमवारी परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर केलेल्या एका पोस्टमध्ये अशी आशा व्यक्त केली होती की, चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, युनायटेड किंगडम आणि या परिस्थितीमुळे प्रभावित झालेले इतर देश हा जलमार्गाला ‘सुरक्षित आणि खुला’ ठेवण्यासाठी आपापल्या युद्धनौका या भागात पाठवतील. मात्र, ट्रम्प यांनी उल्लेख केलेल्या देशांकडून अद्याप कोणतीही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
अमेरिकेकडून भारताला या प्रदेशात युद्धनौका पाठवण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे का? आणि या मुद्द्यावर भारताची भूमिका काय आहे? असा प्रश्न परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना विचारण्यात आला. यावर भारताने या विषयावर अमेरिकेबरोबर कोणतीही द्विपक्षीय चर्चा केलेली नाही, असे उत्तर जयस्वाल यांनी दिले.
“अनेक देशांकडून या विषयावर चर्चा केली जात असल्याबद्दल आम्हाला कल्पना आहे. मात्र, आम्ही अद्याप यावर द्विपक्षीय पातळीवर कोणतीही चर्चा केलेली नाही,” असे जयस्वाल म्हणाले. तसेच भारत या मुद्द्यावर विविध भागीदारांबरोबर चर्चा सुरू ठेवेल, असेही जयस्वाल यांनी पुढे बोलताना सांगितले.
फायनान्शिअल टाइम्सला दिलेल्या एका वेगळ्या मुलाखतीत बोलताना जयस्वाल यांनी इशारा दिला की, “जर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही किंवा नकारात्मक प्रतिसाद मिळाला, तर मला वाटते की ते नाटोच्या भविष्यासाठी अत्यंत वाईट असेल.”
यादरम्यान इराणबरोबर सुरू असलेल्या युद्धाबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची योजना काय आहे आणि हा संघर्ष कधी संपेल, याबद्दल युरोपीय देशांनी सोमवारी अधिकची माहिती मागितली आहे. पर्शियन आखातामधील सुरक्षा वाढवण्यासाठी युद्धनौका पाठवण्याच्या ट्रम्प यांच्या आवाहनावर निर्णय घेण्यापूर्वी या देशांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
युरोपियन युनियनचे परराष्ट्र मंत्री ट्रम्प यांच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी एकत्र आले असताना, जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलने त्यांच्या तैनातमागील लष्करी ध्येय साध्य झाले असे ते नक्की कधी मानतील हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे.
“आम्हाला याबाबत अधिक स्पष्टता हवी आहे,” असेही जर्मनीचे परराष्ट्र मंत्री यावेळी म्हणाले.
