India Response To Pakistan Criticism On Ayodhya Flag Hoisting: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिरात ध्वजारोहण केले. यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने भारतात मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केला आहे. भारताने आता यावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत पाकिस्तानला ढोंगीपणाचा प्रचार थांबवावा आणि वर्तन सुधारावे, असे सुनावले आहे.

राम मंदिरातील ध्वजारोहणावरील पाकिस्तानच्या टीकेला प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “आम्ही पाकिस्तानचे आरोप पूर्णपणे नाकारतो. धर्मांधता, दडपशाही आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचा कलंकित इतिहास असलेल्या पाकिस्तानला इतरांना उपदेश करण्याचा नैतिक अधिकार नाही. ढोंगी उपदेश देण्याऐवजी पाकिस्तानने आपल्या देशातील मानवी हक्कांच्या उल्लंघनाची अत्यंत वाईट आकडेवारीवर पाहावी.”

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचे प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवला. त्याद्वारे सांस्कृतिक उत्सवाचा आणि राष्ट्रीय एकतेचा नवा अध्याय सुरू होत आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले होते.

भारताने चीनबद्दल काय म्हटले?

२१ नोव्हेंबर रोजी भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिक पेमा वांगजोम यांना पासपोर्टवर अरुणाचल प्रदेश हे त्यांचे जन्मस्थान असल्याचे नमूद केल्यामुळे शांघायमध्ये चिनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना १८ तास ताब्यात घेतले होते.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रणधीर जयस्वाल म्हणाले, “काल तुम्ही पाहिले असेलच की, अरुणाचल प्रदेशातील एका भारतीय नागरिक असलेल्या महिलेला चीनच्या शांघायमध्ये मनमानी पद्धतीने ताब्यात घेण्यात आले होते. आम्ही हे सांगू इच्छितो की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. चीनने हे नाकारल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही.”

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशने भारताला केलेल्या विनंतीवर बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “हो, आम्हाला त्यांच्याकडून विनंती करण्यात आली आहे. आम्ही त्या विनंतीवर चौकशी सुरू केली आहे. आम्ही बांगलादेशच्या लोकांप्रती वचनबद्ध आहोत. आम्ही या संदर्भात सर्व संबंधितांशी सकारात्मकपणे संवाद साधत आहोत.”