India on Russia oil import: अमेरिका व इराण यांच्यातील युद्ध, त्यापाठोपाठ डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातल्या देशांवर लादलेले टॅरिफ, त्यावर झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चा आणि त्यानंतर भारतानं रशियाकडून तेलखरेदी बंद करावी यासाठी अमेरिकेचा दबाव, या मुद्द्यांवर गेल्या काही महिन्यांत मोठी चर्चा पाहायला मिळाली. भारतानं रशियाकडून तेलखरेदी थांबवली, तर रशिया व युक्रेन यांच्यात चालू असलेलं युद्ध थांबेल किंवा रशियाला मिळणारी रसद खंडित होईल, असा दावा अमेरिकादी देशांकडून करण्यात आला. मात्र, आता भारताकडून यासंदर्भात ठाम भूमिका मांडण्यात आली असून भारतानं रशियाकडून तेलखरेदी थांबवली, तरी रशिया व युक्रेनमध्ये चालू असलेलं युद्ध थांबणार नसल्याचं भारतानं सांगितलं आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युद्ध संपवण्याचं आवाहन केलेलं असतानाच दुसरीकडे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे द्विपक्षीय चर्चांसाठी क्यीव येथे दाखल झाले आहेत. गुरुवारी या चर्चेवेळी एस. जयशंकर यांनी भारतानं रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. क्यीव येथे जयशंकर यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. यानंतर ते बोलत होते.

रशिया-युक्रेन युद्धाबाबत काय म्हणाले जयशंकर?

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावेळी रशियाकडून तेलखरेदी बंद करणं हा युद्ध समाप्तीसाठीचा उपाय नसून चर्चा आणि त्यातून निघणारा राजनैतिक तोडगा हाच युद्ध समाप्तीसाठीचा उपाय असल्याचं नमूद केलं. या दोन्ही देशांमध्ये चालू असलेलं युद्ध समाप्त करण्यासाठी भारत शक्य त्या सर्व मार्गांनी मदत करायला तयार आहे, असंदेखील जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

युक्रेनचे परराष्ट्रमंत्री अँड्री सैबिहा यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडली. “कुणीतरी तेलखरेदी करतंय किंवा नाही करत यामुळे हे युद्ध थांबणार नाही. आता हे युद्ध सुरू होऊन चार वर्षं झाली. हा संघर्ष फक्त चर्चा, संवाद, डिप्लोमसी आणि तडजोडी यातूनच मिटवला जाऊ शकतो. त्यामुळेच भारताकडून कायमच या प्रक्रियेला प्रोत्साहन दिलं जाईल”, असं जयशंकर यावेळी म्हणाले.

भारतासाठी इंधनपुरवठा हे एक आव्हान – जयशंकर

यावेळी जयशंकर यांनी भारतासाठीचा इंधनपुरवठा हे एक आव्हान असल्याचं सांगितलं. “भारतातल्या १४० कोटी लोकसंख्येसाठी इंधनपुरवठा करणं हे खरंच एक मोठं आव्हान आहे”, असं सांगतानाच जयशंकर यांनी रशियाकडून तेल खरेदीबाबत युक्रेनच्या भूमिकेचा भरत जसा सन्मान राखतो, तशीच अपेक्षा भारताच्या भूमिकेबाबतदेखील ठेवतो, असंदेखील जयशंकर यांनी नमूद केलं.