वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी ३० दिवसांची सवलत दिल्यानंतर, विरोधकांकडूून केंद्र सरकारला लक्ष्य केले जात आहे. परंतु, ‘भारत आपल्या राष्ट्रहितासाठी जिथून योग्य वाटेल तिथून तेल खरेदी करेल. इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’त तणाव वाढला आहे, अशा स्थितीत जो देश सर्वोत्तम दर देईल, त्या कोणत्याही देशाकडून कच्चे तेल खरेदी केले जाईल, त्यासाठी कोणत्याही देशाच्या परवानगीची गरज नाही,’ असे केंद्र सरकारने प्रत्युत्तरात म्हटले आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढत असूनही देशाचा ऊर्जा पुरवठा सुरक्षित आणि स्थिर आहे. भारताने कच्च्या तेलाच्या स्रोतांचे २७ वरून ४० देशांपर्यंत विविधीकरण केले आहे, ज्यामुळे पुरवठ्याचे अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. राष्ट्रीय हितासाठी भारत केवळ तिथूनच तेल खरेदी करतो, जिथे स्पर्धात्मक आणि परवडणारे दर उपलब्ध असतात. प्रगत रिफायनरी क्षमतेमुळे विविध प्रकारचे कच्चे तेल शुद्ध करणे शक्य झाले आहे, ज्यामुळे विनाव्यत्यय पुरवठा करता येतो, असे केंद्र सरकारने स्पष्टीकरणात म्हटले आहे.

अमेरिकेने दिलेल्या तात्पुरत्या सवलतीनंतरही रशियाकडून तेल आयात सुरू ठेवणार असल्याचे सरकारने शनिवारी स्पष्ट केले. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही सवलत देण्यात आली होती. परंतु अशा तेल खरेदीसाठी कोणत्याही देशाच्या परवानगीची गरज नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.

रशियातून तेल खरेदीसाठी भारत कधीही कोणत्याही देशाच्या परवानगीवर अवलंबून नव्हता. रशिया-युक्रेन युद्धाच्या तीन वर्षांच्या काळात, अमेरिका आणि ‘युरोपियन युनियन’चा आक्षेप असूनही भारताने रशियातून तेल खरेदी सुरू ठेवली. सवलतीच्या दरामुळे आणि रिफायनरीच्या मागणीमुळे २०२२ नंतर आयातीत मोठी वाढ झाली आहे. – केंद्र सरकार

अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी मोदी सरकारला ट्रम्प यांच्या आदेशांचे प्रामाणिक पालन केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले आहे. स्वयंघोषित ५६ इंचाची छाती किती भित्री आणि तडजोड करणारी झाली आहे, याबद्दल आणखी काही सांगण्याची गरज आहे का? – जयराम रमेश, काँग्रेस सरचिटणीस

हे मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेले कृत्य : जयशंकर

एक्स्प्रेस वृत्त

नवी दिल्ली : ज्या दिवशी हिंदी महासागरात अमेरिकेच्या पाणबुडीने इराणच्या ‘आयआरआयएस देना’ या युद्धनौकेवर हल्ला केला, त्याच दिवशी भारताने इराणच्या एका जहाजाला बंदरात येण्याची परवानगी दिली होती, याला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी दुजोरा दिला. ‘तेव्हा त्यांना परवानगी देणे हे मानवतेच्या दृष्टीने योग्य पाऊल होते, असे मला वाटते. आम्ही याच तत्त्वाने प्रेरित होतो,’ असे जयशंकर म्हणाले.

दिल्लीतील ‘रायसिना डायलॉग’मध्ये जयशंकर यांनी इराणच्या ‘आयआरआयएस लावन’ या जहाजाचा उल्लेख केला. ‘आयआरआयएस लावन’ ४ मार्च रोजी कोचीमध्ये दाखल झाले असून, त्यावरील १८३ कर्मचारी सध्या शहरातील नौदलाच्या सुविधा केंद्रात वास्तव्यास आहेत, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.

खलाशांचे मृतदेह श्रीलंका पाठवणार

कोलंबो : ‘आयआरआयएस देना’ या युद्धनौकेवरील खलाशांचे मृतदेह श्रीलंका सरकार परत पाठवणार असल्याची माहिती श्रीलंकेने दिली. श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवरील गालेजवळ अमेरिकन पाणबुडीच्या हल्ल्यात इराणी युद्धनौका ‘आयआरआयएस देना’ बुडाल्यानंतर, ८४ इराणी खलाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.