नवी दिल्ली : करोना साथीत जगभर झालेल्या एकूण मृत्यूंच्या गणनेसाठी जागतिक आरोग्य संघटनेने अवलंबिलेली पद्धत चुकीची असल्याचा भारताचा दावा अयोग्य असल्याचे आरोग्य संघटनेच्या गणना पथकातील तज्ञाने म्हंटले आहे. भारतातील करोना मृतांचा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा खूप जास्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या गणना अहवालात नमूद केल्याचे वृत्त आहे.

‘जागतिक स्तरावर कोविडने झालेल्या मृत्यूची संख्या जाहीर करण्यासाठी भारत आरोग्य संघटनेला रोखत आहे’ असा लेख शनिवारी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाला. त्यावर त्याच दिवशी भारताच्या आरोग्य मंत्रालयाने आक्षेप नोंदवत अधिकृत आकडेवारीपेक्षा जास्त मृत्यूंबाबत आरोग्य संघटनेची गणना पद्धत योग्य नसल्याचे नमूद केले होते. आरोग्य संघटनेने ही आकडेवारी अद्याप अधिकृतरित्या जाहीर केली नसली तरी न्यूयॉर्क टाइम्सच्या दाव्यानुसार जगभरात करोनामुळे २०२१ अखेर एक कोटी ५० लाख मृत्यू झाले असल्याची आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. प्रत्येक देशाने पुरवलेल्या करोना मृत्यूंच्या अधिकृत आकडेवारीनुसार जगातील एकूण करोना मृतांची संख्या ६० लाख आहे. मात्र, आरोग्य संघटनेची एकूण आकडेवारी दुपटीपेक्षाही जास्त आहे. त्यात भारतात ४० लाख करोना मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. मात्र, भारतात काल, मंगळवारअखेर पाच लाख २० हजार मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे. आरोग्य संघटनेची भारतातील मृतांची कथित आकडेवारी त्यापेक्षा आठ पट अधिक असल्याचे वृत्त आहे. यात माहितीस्त्रोतांचे नाव दिलेले नाही.

या गणनेची पद्धत ठरवणाऱ्या आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य जॉन वेकफिल्ड यांनी सोमवारी यासंदर्भात ट्वीट केले. त्यात नमूद केले, की मृतांच्या गणना पद्धतीबाबत भारताच्या आरोग्य मंत्रालयाने केलेले वक्तव्य अयोग्य आहे. त्यासह त्यांनी जी गणनापद्धत अवलंबली त्याच्या शोधनिबंधांच्या लिंकही त्यांनी ट्विटमध्ये दिल्या आहेत. वेकफिल्ड हे वॉशिंग्टन विद्यापीठात जैवसांख्यिकी विभागाचे प्राध्यापक आहेत. 

आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात खुलाशादाखल जारी केलेल्या सविस्तर निवेदनात नमूद केले आहे, की आम्ही या संदर्भात आरोग्य संघटनेच्या नियमित संपर्कात आहोत. मृतांच्या गणनेच्या पद्धतीविषयी आम्ही आक्षेप घेतला आहे. आमच्यासह  चीन, इराण, सिरिया, इथियोपिया आणि इजिप्तनेही याबाबत नोव्हेंबर २०२१ पासून सहा वेळा आक्षेप घेतला आहे.

भारताचे आक्षेप

* ही गणना करताना आरोग्य संघटनेने जी सांख्यिकीय पद्धत वापरली आहे, त्यात संबंधित देशाचे आकारमान आणि तेथील विविध फरक विचारात घेतलेला नाही. आरोग्य संघटनेच्या गणनापद्धतीनुसार देशांना ‘टियर १’ आणि ‘टियर २’ अशा दोन गटांत विभागले असून,  ‘टियर १’ देशांतील मृतांची आकडेवारीची पद्धत ‘टियर २’ देशांबाबतही अवलंबली आहे. हे अन्यायकारक आहे.

* जगभरातील देशांतील मासिक तापमान, मासिक सरासरी मृत्यू, नागरिकांचे उत्पन्न हे निकष लावण्यावरही भारताचा आक्षेप आहे. भारताबाबत ‘टियर १’ देशांचा निकष लावून ही आकडेवारी विभिन्न दाखवली आहे.

* भारताच्या १८ राज्यांतून मिळालेल्या अनधिकृत आकडेवारीचाही वापर केला गेला आहे. त्यामुळे मोठी तफावत आढळत असल्याने या गणनापद्धतीची अचूकता,वैधता आणि विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे भारताचे म्हणणे आहे. आपल्या राज्यांच्या पातळीची आकडेवारी पडताळून पाहिलेली नसल्याचाही भारताचा दावा आहे.