मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील सूत्रधार दाऊद इब्राहिम याला ताब्यात देण्याची मागणी भारताने केली आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितले की, दाऊद कराचीत आहे व त्याला पाकिस्तानने भारताच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी आहे. त्याच्याविरोधात आम्ही पाकिस्तानला अनेक पुरावे दिले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानने कृती करायची आहे व त्याला भारताच्या ताब्यात देण्यात यावे. लखनौ येथे गृह मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले की, दाऊद हा अतिरेकी आहे व त्याला ताब्यात देण्याची मागणी केली आहे.
*दाऊदचा कराचीत क्लिफ्टन परिसरात प्रचंड आलिशान बंगला
*आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या आशीर्वादाने दाऊद संरक्षण.
*दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर मुंबईत असून गुन्ह्य़ांतून त्याची निर्दोष मुक्तता.
*त्याच्या हालचालींवर मुंबई पोलिसांची नजर आहे. परंतु काहीही ठोस हाती लागत नसल्यामुळे गुन्हे अन्वेषण विभाग काहीही करू शकलेले नाही.
*दाऊदचे फोनवरील संभाषणच प्रसिद्ध झाले आहे.

वेळोवेळी डॉसिअर
मुंबई : दाऊद इब्राहिमविषयी मुंबई पोलिसांनी वेळोवेळी डॉसिअर (पुरावे) सादर केला होता. बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) त्याचा स्वतंत्र डॉसिअर तयार केला आहे. मुंबईत अनेक गुन्ह्य़ातही दाऊदला फरारी दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे याबाबतची माहितीही मुंबई पोलिसांनी वेळोवेळी केंद्रीय तपास यंत्रणांना पुरविली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पुढे काहीही हालचाली झाल्या नाहीत.