Indian commercial ships and oil tankers in Strait of Hormuz : अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याकरता इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांच्या वाहतुकीवर नियंत्रण आणले आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे. इंधनाच्या आयातीसाठी भारत अग्रेसर अनेक सर्वाधिक ये-जा करण्यात भारताचा क्रमांक वरचा लागतो. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताच्या अनेक व्यापारी जहाजांची वाहतूक होत असते. इराणविरोधातील युद्ध चालू झाल्यापासून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आतापर्यंत आठ भारतीय जहाजांनी प्रवास केला. तर १० पेक्षा जास्त जहाजांनी पश्चिम आशियाई प्रदेश ओलांडला आहे.
तेहरानच्या मते, आखाती देशांकडून जगभरात तेल आणि वायू निर्यातीसाठी महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी केवळ अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांसाठी बंद आहे. इराणने “मित्र” राष्ट्रांना होर्मुझमधून जहाजांना जाण्याची परवानगी दिली आहे. पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू झाले, तेव्हा होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये २८ भारतीय ध्वज असलेली जहाजे होती. यापैकी २४ जहाजे सामुद्रधुनीच्या पश्चिम बाजूला आणि चार पूर्व बाजूला होती. पीटीआयच्या वृत्तानुसार, पश्चिम बाजूकडील सात आणि पूर्व बाजूकडील दोन जहाजे सुरक्षित स्थळी पोहोचण्यात यशस्वी झाली आहेत.
युद्धक्षेत्रातून सुरक्षितपणे पार केलेल्या भारतीय जहाजांची संपूर्ण यादी

ग्रीन सान्वी – गॅस पुरवठा घेऊन जाणारे ‘ग्रीन सान्वी’ हे भारतीय एलपीजी टँकर, युद्धग्रस्त होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करणारे नवीन जहाज आहे. “एलपीजी जहाज ‘ग्रीन सान्वी’ने जहाजावर २५ खलाशांसह ४६,६५० टन एलपीजी माल वाहून नेत होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली आहे,” असे एका सरकारी निवेदनात म्हटले आहे.
बीडब्ल्यू टीवायआर आणि बीडब्ल्यू ईएलएम – एकूण सुमारे ९४,००० टन एलपीजी या दोन वाहक जहाजांनी या प्रदेशातून सोमवारी सुरक्षितपणे प्रवास केला. बीडब्ल्यू टीवायआर ३१ मार्च रोजी मुंबईला पोहोचले, तर बीडब्ल्यू ईएलएम १ एप्रिल रोजी न्यू मंगलोर येथे दाखल झाले.
पाइन गॅस आणि जग वसंत – भारतीय ध्वज असलेले आणखी दोन एलपीजी टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेल्या महिन्यात सुरक्षितपणे पार गेले होते. ९२,६१२ टन एलपीजी घेऊन जाणारे पाइन गॅस आणि जग वसंत हे टँकर २६ मार्च ते २८ मार्च दरम्यान भारतीय बंदरांवर पोहोचले.
शिवालिक आणि नंदा देवी – २८ फेब्रुवारी रोजी इराण युद्ध सुरू झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणारी एमटी शिवालिक आणि एमटी नंदा देवी ही पहिली भारतीय जहाजे होती. सुमारे ९२,७१२ टन एलपीजी घेऊन जाणारी ही दोन जहाजे अनुक्रमे १६ मार्च रोजी गुजरातमधील मुंद्रा बंदरात आणि १७ मार्च रोजी त्याच कांडला बंदरात पोहोचली होती.
सी बर्ड – इराणचे ‘सी बर्ड’ नावाचे जहाजही मंगळूर बंदरात पोहोचले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सुमारे ४४,००० टन इराणी एलपीजी घेऊन जाणारे ‘सी बर्ड’ हे एलपीजी जहाज २ एप्रिल रोजी भारतातील मंगळूर बंदरात दाखल झाले असून, सध्या तेथे माल उतरवला जात आहे.” इराण युद्धाच्या सुरुवातीपासून गगनाला भिडलेल्या किमती कमी करण्यासाठी, अमेरिकेने गेल्या महिन्यात इराणी तेल आणि शुद्ध केलेल्या उत्पादनांवरील निर्बंध तात्पुरते शिथिल केल्यानंतर ही खरेदी करण्यात आली आहे.
जग लाडकी आणि जग प्रकाश – संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) ८०,८८६ टन कच्चे तेल घेऊन आलेला भारतीय ध्वजांकित तेल टँकर ‘जग लाडकी’ १८ मार्च रोजी मुंद्रा येथे पोहोचला. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या जहाजाने संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) फुजैरा बंदरातून प्रवास सुरू केला. ओमानहून आफ्रिकेकडे गॅसोलीन घेऊन जाणाऱ्या ‘जग प्रकाश’ या दुसऱ्या टँकरने यापूर्वीच सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली असून तो टांझानियाच्या मार्गावर आहे.
एलपीजी वाहक जहाजे ‘जग विक्रम’ आणि ‘ग्रीन आशा’ अजूनही पश्चिम होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आहेत. एका रिकाम्या जहाजात एलपीजी भरला जात आहे.
परराष्ट्रमंत्री काय म्हणाले?
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ‘फायनान्शिअल टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजवाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी इराणसोबतची थेट चर्चा हा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे म्हटले होते. जयशंकर म्हणाले की, भारतीय ध्वज असलेल्या जहाजांसाठी कोणतीही “सर्वसमावेशक व्यवस्था” नाही आणि त्या बदल्यात इराणला काहीही मिळालेले नाही. “ही एक स्वागतार्ह घडामोड असली तरी, त्यावर काम सुरू असल्याने चर्चा सुरूच आहे,” असे त्यांनी ‘एफटी’ला सांगितले.
कच्चे तेल व नैसर्गिक वायूची आवश्यकता किती?
देशात दररोज ५५ लाखांहून अधिक कच्च्या तेलाच्या बॅरल्सची मागणी असते. तसेच औद्योगिक क्षेत्रात, खत व ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू म्हणजेच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलएनजी) ची आवश्यकता असते. भारताला दररोज १९० ते १९५ दशलक्ष मेट्रिक स्टॅण्डर्ड क्यूबिक मिटर्स (MMSCMD) नैसर्गिक वायूची आवश्यकता आहे. दरम्यान, २०३० पर्यंत भारताच्या नैसर्गिक वायू गरजेत वाढ होऊन ती ३०० दशलक्ष मेट्रिक स्टॅण्डर्ड क्यूबिक मिटर्स (MMSCMD) पर्यंत वाढेल अशी शक्यता आहे.
कोणत्या देशांकडून भारत सध्या तेल आयात करत आहे?
भारत सध्या ब्राझील, नोर्वे, कॅनडा, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांकडून कच्चे तेल व नैसर्गिक वायू आयात करत आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी अर्जेंटिनाकडून देखील आयात केली जात असल्याची माहिती दिली आहे. “भारताला कच्चे तेल व नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या देशांची संख्या २७ वरून ४१ झाली आहे. त्यात अर्जेंटिना हा देश देखील जोडला गेला आहे. सध्याची परिस्थिती खडतर आहे. पण आपण इतर देशांकडून तेल आयात करण्यासाठी तयार आहोत”, असे हरदीप सिंह पुरी म्हणाले होते. दरम्यान, लॅटिन अमेरिकेकडून भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या निर्यातीत ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ब्राझील व इतर देशांकडून भारताला होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या निर्यातीत वाढ झाली आहे.
