जगदगुरु परमहंस आचार्य महाराज यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. मंगळवारी त्यांनी अयोध्येमध्ये भारताला गांधी जंयतीपर्यंत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं अशी मागणी केलीय. तसेच केंद्र सरकारने असं केलं नाही तर आपण जलसमाधी घेऊ असंही महाराजांनी म्हटलं आहे.

जगदगुरु परमहंस आचार्य महाराजांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही मागणी केलीय. “माझी मागणी आहे की २ ऑक्टोबरपर्यंत भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित करावं, नाहीतर मी शरयू नदीमध्ये जलसमाधी घेईल. तसेच केंद्र सरकारने मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांचं नागरिकत्व काढून घ्यावं,” असं जगदगुरु परमहंस आचार्य महाराज यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मंगळवारी सूरतमध्ये हिंदूत्व एक वैचारिक व्यवस्था असून सर्वांना सोबत घेऊन चालणे आणि एकत्र आणण्याचा विचार या व्यवस्थेतून मांडला जातो असं मत व्यक्त केलं. भागवत हे आपल्या तीन दिवसीय सूरत दौऱ्यादरम्यान १५० मोजक्या आमंत्रितांना संबोधित करताना बोलत होते. “हिंदूत्व सर्वांना एकत्र आणते आणि एकत्र वाटचाल करण्याची प्रेरणा देते. ते सर्वांना जोडून घेते आणि सर्वांनाच समृद्ध बनवते” असं भागवत म्हणाले होते.

कधी कधी अडचणी दूर करताना संघर्ष होतो. मात्र हिंदूत्व हे संघर्षाबद्दल नाहीय, असंही भागवत म्हणाले होते. “अडचणी दूर करण्यासाठी शक्तीची आवश्यकता असते. कारण जगाला शक्तीचीच भाषा कळते. आपल्याला शक्तीशाली बनावं लागेल. मात्र अशी शक्ती अत्याचारासाठी कधीच वापरली जाऊ नये. धर्माचे रक्षण करतानाच ही शक्ती जगाला एकत्र आणण्याचं काम करत,” असं भागवत म्हणाले. “एक देश म्हणजे एकच संस्कृती आणि उद्देशाने जोडलेल्या लोकांचा गट असतो,” असंही भागवत म्हणाले.