भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये (यूएनएससी) भारताला कायम स्वरुपी सदस्यत्व मिळण्यासंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाही भारताला सुरक्षा परिषदेमध्ये कायमचं सदस्यत्व मिळालं पाहिजे असं वाटतं असल्याचं श्रृंगला यांनी सांगितलं. मागील बऱ्याच काळापासून भारताकडून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये कायम स्वरुपी सदस्यत्व मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे भारताच्या या प्रयत्नांना यश मिळण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांची व्हाइट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चेसाठी भेट घेतली. याच भेटीसंदर्भात बोलताना शृंगला यांनी बायडेन यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. बायडेन यांनी भारत सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत असल्याचं मत व्यक्त केलंय. खास करुन अफगाणिस्तान मुद्द्यावरुन बायडेन यांनी भारताने घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी यासंदर्भात बोलताना, माझ्या मते भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये कायम स्वरुपी सदस्यत्व मिळालं पाहिजे, असं मत व्यक्त केल्याचं श्रृंगला म्हणाले.

भारत कधी होता सदस्य?

भारताला आतापर्यंत १९५०-१९५१, १९६७- १९६८, १९७२- १९७३, १९७७- १९७८, १९८४- १९८५, १९९१- १९९२ दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर तात्पुरत्या स्वरुपाचा सदस्य म्हणून स्थान मिळालं होतं. भारताला एकूण सात वेळा असा सन्मान मिळालाय. नुकताच भारत २०११-२०१२ दरम्यान या परिषदेचा सदस्य झाला होता.

कोणते देश आहेत यामध्ये?

यूएनएससीमध्ये एकूण १५ सदस्य देश असतात. त्यापैकी १० सदस्य हे तात्पुरत्या स्वरुपाचे तर पाच सदस्य कायम स्वरुपी आहेत. एकूण १९३ सदस्य असणाऱ्या यूएनएससीमध्ये दरवर्षी दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी पाच तात्पुरत्या स्वरुपाच्या राष्ट्रांची निवड केली जाते. या परिषदेमध्ये कायम स्वरुपी सदस्यत्व असणाऱ्या देशांमध्ये चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंग्डम आणि अमेरिका या पाच देशांचा समावेश आहे.

मोदींनी बायडेन यांना दिलं आमंत्रण

शृंगला यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी द्विपक्षीय बैठकीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या अध्यक्षतेचं कौतुक करताना अफगाणिस्तानच्या मुद्द्याचा खास करुन उल्लेख केला. बायडेन यांनी भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळालं पाहिजे अशी इच्छा व्यक्त केल्याचं श्रृंगला यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी बायडेन यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलंय.