पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

बदलते जग आणि युद्धाच्या पद्धती लक्षात घेऊन भारताने आपली लष्करी क्षमता वाढवली पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. जम्मू-काश्मीरमधील राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये दिवाळीनिमित्त सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे भाष्य केले.

दळणवळण आणि सैन्य तैनातीचा विस्तार करण्यासाठी आधुनिक पायाभूत सीमा सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. संरक्षण क्षेत्रातील विकासासाठी सरकारच्या गेल्या काही वर्षांतील प्रयत्नांची माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की, संरक्षण अर्थसंकल्पातील सुमारे ६५ टक्के निधी देशांतर्गत संरक्षणासाठीच्या खरेदीवर खर्च होत आहे.

सीमावर्ती भागातील संपर्क सुधारला आहे. लडाख ते अरुणाचल प्रदेश, जैसलमेर ते अंदमान निकोबार बेटे असो, सीमा आणि किनारी भागात आता रस्ते आणि ऑप्टिकल फायबरने जोडली गेली आहेत, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की आमची तैनात क्षमता वाढविण्यात आम्हाला मदत झाली आहे.

आज अर्जुन रणगाडे देशात तयार होत आहेत, तेजससारखी विमानेही देशात बनवली जात आहेत. पूर्वी, सुरक्षा दलांसाठी संरक्षण उपकरणे खरेदी करण्यासाठी अनेक वर्षे लागायची. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेची वचनबद्धता हाच जुन्या पद्धती बदलण्याचा एकमेव मार्ग आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

सीमावर्ती जिल्ह्यात जवानांसोबत दिवाळी साजरी करणाऱ्या पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षिततेला हानी पोहोचविण्याच्या प्रयत्नांना लष्कराने दिलेल्या तत्पर प्रत्युत्तराचे कौतुक पंतप्रधानांनी केले. ‘येथील शांतता बिघडवण्याचे अनेक प्रयत्न झाले पण प्रत्येक वेळी त्याला चोख प्रत्युत्तर दिले गेले’, असे ते म्हणाले.

२०१६ च्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये पाकिस्तानमधील नियंत्रण रेषेपलीकडे दहशतवाद्यांच्या लाँच पॅडवर भारतीय लष्कराने बजावलेल्या भूमिकेचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. ‘सर्जिकल स्ट्राइकच्या वेळी सैनिकांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो,’ असे पंतप्रधान म्हणाले.

सैनिकांना ‘भारत मातेचे’चे ‘सुरक्षा कवच’ म्हणत त्यांनी देशाच्या सीमांचे अथकपणे रक्षण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. मोदी म्हणाले की जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. त्यामुळेच संपूर्ण देश सुखाची झोप घेऊ शकतो. जवानांमुळेच देशात शांतता आणि सुरक्षितता आहे. जवान त्याग आणि शौर्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत, असे गौरवोद्गागारही त्यांनी काढले.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी, लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी राजौरीसह इतर भागांची हवाई पाहणी केली. जम्मूमधील नियंत्रण रेषेवरील (एलओसी) सध्याच्या सुरक्षा परिस्थितीबद्दलही त्यांनी माहिती घेतली.

स्त्रियांच्या सहभागाने  नवी ओळख

लष्करात स्त्रियांचा सहभाग वाढत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. एनडीए आणि इतर मिलिट्री स्कूलमध्येही स्त्रियांना संधी दिली जात आहे. आता लष्करातही स्त्रियांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळेच आपल्या लष्कराची नवी ओळख निर्माण झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.