भाजपाचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी आपल्या एका वादग्रस्त विधानाची आठवण करुन दिली आहे. भारताचा शेजारी देश असणाऱ्या बांगलादेशमध्ये हिंदूवरील अत्याचार थांबत नसतील तर भारताने बांगलादेशवर हल्ला करावा असं स्वामी यांनी म्हटलं आहे. खरं तर स्वामी यांनी हे वक्तव्य तीन वर्षांपूर्वी २०१८ साली केलं होतं. मात्र सध्या बांगलादेशमध्ये सुरु असणाऱ्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या वक्तव्याची बातमी शेअर करत आपण अनेक वर्षांपूर्वीच इशारा दिला होता असं म्हटलंय. सध्या बांगलादेशमध्ये मुस्लीम विरुद्ध हिंदू असा संघर्ष पेटला असून त्याच्या पार्श्वभूमीवरच स्वामींनी आपल्या या जुन्या वक्तव्याचा पुन्हा एकदा दाखला दिलाय.

त्रिपुरामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना स्वामींनी तीन वर्षांपूर्वी हे वक्तव्य केलं होतं. “भारत बांगलादेशला कायमच समर्थन देत राहील. मात्र पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंदूंच्या मंदिरांची विटंबना करणाऱ्यांना, मंदिरांचं रुपांतर मशीदींमध्ये करणाऱ्या आणि हिंदूंचं धर्मांतर करुन त्यांना मुस्लीम करणाऱ्या वेड्या लोकांना थांबवलं पाहिजे,” असं स्वामी यांनी म्हटलं होतं.

बांगलादेशने हिंदूंचा छळ करणं थांबवलं नाही तर मी असा सल्ला देईल की भारत सरकारने बंगलादेशवर हल्ला करुन तेथील प्रदेशावर ताबा घ्यावा, असं स्वामी यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआयने दिलं होतं. याच बातमीची लिंक स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन शेअर केलीय.

अगरतळा येथे संस्कृतिक गौरव संस्थानने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला स्वामी यांनी हजेरी लावली होती. यावेळी स्वामी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही टीका केली. इम्रान खान हे केवळ चपरासी म्हणजेच वॉचमन असून आयएसआय, लष्कर आणि दहशतवादीच पाकिस्तानचा कारभार चालवत असल्याचा टोला स्वामींनी लगावला. तसेच पुढे बोलताना याच कारणामुळे पाकिस्तानशी चर्चा करण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले होते.

“इम्रान खान हे केवळ चपरासी आहेत. पाकिस्तानचा कारभार लष्कर, आयआय आणि दहशतवादी चालवत असून इम्रान हे सरकारी चपरासी आहेत. त्यांना पंतप्रधान म्हणत असले तरी ते चपरासीच आहेत,” असं स्वामी यांनी म्हटलं. इम्रान खान सत्तेत आल्यापासून पाकिस्तानमधून भारतात दहशतवाद्यांनी घुसखोरीचे प्रयत्न करण्याचे प्रमाण वाढल्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर स्वामी उत्तर देत होते.