राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी पाकिस्तानबाबत मोठं विधान केलं आहे. भारताने पाकिस्तानशी चर्चेचा मार्ग खुला ठेवला पाहिजे. आपल्या देशाची सुरक्षा आणि रक्षा या दोन्ही मुद्द्यांच्या अनुषंगाने हे आवश्यक आहे. आपल्याला पाकिस्तानशी चर्चेचे दरवाजे बंद करुन चालणार नाही असं मत दत्तात्रय होसबळेंनी मांडलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत होसबळे यांनी हे विधान केलं आहे.

दत्तात्रय होसबळे यांनी पाकिस्तानबाबत काय भूमिका मांडली?

PTI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दत्तात्रय होसबळेंना हा प्रश्न विचारण्यात आला की भारताने पाकिस्तानबाबत काय भूमिका घेतली पाहिजे? यावर उत्तर देताना होसबळे म्हणाले की भारताने पाकिस्तानशी चर्चेचा मार्ग खुला ठेवला पाहिजे. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे बसने लाहोरला गेलो होते आणि त्यांनी शांती प्रस्तावाची सुरुवात केली होती. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथविधीसाठी पाकिस्तानला निमंत्रण दिलं होतं तसंच एक ते नंतर एका पाकिस्तानातील नेत्याच्या घरी जे लग्न होतं त्या सोहळ्यालाही उपस्थित राहिले होते. या सगळ्या गोष्टी झाल्या तरीही पाकिस्तानने कुरापती सुरु ठेवल्या आहेत ही बाब दुर्दैवी आहे. पुलवामा सारखे हल्ले करुन पाकिस्तानने त्यांची नियत दाखवून दिली. अशावेळी भारताने त्यांना चोख उत्तरही दिलं. कारण कुठल्याही देशाची सुरक्षा आणि स्वाभिमान हा सर्वतोपरी असतो. त्यामुळे सरकारने ती पावलं उचलली होती आणि ती योग्यही होती. मात्र मला असं वाटतं की पाकिस्तनाशी चर्चेचे दरवाजे हे पूर्णपणे बंद करायला नकोत. दोन्ही देशांमध्ये संवाद, चर्चा व्हायला हवी. चर्चा आणि संवाद असेल तर व्यापार व्यवसाय वाढतो, तसंच व्हिसाही दिला जातो. जर आपण संवादाची सगळी दारं लावून टाकणार असू तर दोन्ही देशांमधले संबंध सुधारतील अशी आशाही संपून जाईल. पाकिस्तान आणि भारत यांच्यात तणाव आहे हे मला ठाऊक आहे तरीही चर्चेची दारं खुली ठेवली पाहिजेत असं मला वाटतं असं होसबळे यांनी म्हटलं आहे.

RSS General Secretary Dattatreya Hosabale
पाकिस्तान आणि भारत यांच्यात तणाव आहे, पण आपण चर्चेची दारं खुली ठेवली पाहिजेत असं मत दत्तात्रय होसबळेंनी मांडलं आहे. (फोटो-सोशल मीडिया)

हिंदू राष्ट्र याबाबत होसबळे यांनी काय भूमिका मांडली?

हिंदू राष्ट्र हा उल्लेख धार्मिक नाही आणि अल्पसंख्याकाना हा विश्वास कसा दिला जाईल की ते भारतात सुरक्षित आहेत? हा प्रश्न विचारला असता होसबळे म्हणाले, “भारतात मुस्लिमांना दुय्यम वागणूक मिळते का? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत असं आहे का? तर तसं मुळीच नाही. शिवाय आम्ही अल्पसंख्याक समुदायाच्या नेत्यांसह सातत्याने चर्चा करत असतो. धर्म बदलला म्हणजे राष्ट्रीयत्व बदलत नाही. जर आपल्या देशाची राष्ट्रीयता एक आहे तर आम्ही कुणालाही वेगळं समजत नाही. आम्ही कुठलंही हिंदू राष्ट्र निर्माण करत नाही. तर भारत हा देश हिंदू राष्ट्रच आहे. जेव्हा आपल्या देशात ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हाही हे हिंदू राष्ट्रच होतं.” असं उत्तर होसबळेंनी दिलं आहे.

कोण आहेत दत्तात्रय होसबळे?

दत्तात्रय होसबळे यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेद्वारे त्यांनी राजकीय जीवनास सुरुवात केली. ते अभाविपमध्ये सक्रिय होते. तसंच अभाविपचे दोन दशक संघटन महामंत्री होते. दत्तात्रय होसबळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना पटण्याहून लखनऊला बोलावण्यात आले होते. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०१५ मध्येच होसबळे यांच्याकडे सरकार्यवाहपदाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तो अयशस्वी झाला. संघातील एका गटाने त्यांच्या नावाला विरोध केला होता. २०२१ पासून दत्तात्रय होसबळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह होते. नंतर त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सरचिटणीस हे पद देण्यात आलं.

RSS General Secretary Dattatreya Hosabale
दत्तात्रय होसबळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय आहेत. (फोटो-सोशल मीडिया)

दत्तात्रय होसबळेंबाबत महत्त्वाची माहिती

  • दत्तात्रय होसबळे लहानपणीच संघाचे कार्यकर्ते बनले. १९७० मध्ये ते शिवमोगा येथून बंगळुरु येथे आले. नॅशनल महाविद्यालयातून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर आणीबाणीविरोधात ते पुढे आले.
  • अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांना आणीबाणी जाहीर झाल्याची माहिती होसबळे यांनीच दिली असं सांगितलं जातं. त्यावेळी दोन्ही नेते संसदीय समितीच्या एका बैठकीसाठी बंगळुरू येथे होते.
  • आणीबाणीमधे अटक होण्यापूर्वीच ते भूमिगत झाले होते. त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. आणीबाणी हटवली गेल्यानंतर ते पूर्णत: संघाशी जोडले गेले. १९९२ ते २००३ या कालावधीत त्यांनी अभाविपचे भारताचे आयोजक सचिव म्हणून काम केले. यानंतर त्यांना पुन्हा संघात बोलवण्यात आलं. त्यांना अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख पद देण्यात आलं.