मे २०२५ मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान चीनने पाकिस्तानला उघडपणे तांत्रिक आणि लष्करी मदत पुरवल्याचे वृत्त समोर आल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. चीनचे थेट नाव न घेता भारताने बजावले आहे की, स्वतःला जबाबदार राष्ट्र समजणाऱ्या देशांनी त्यांच्या अशा कृतींचा जागतिक प्रतिमा आणि विश्वासार्हतेवर काय परिणाम होतो, याचे ‘आत्मचिंतन’ करणे आवश्यक आहे.

परराष्ट्र मंत्रालय नेमके काय म्हणाले?

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी मंगळवारी एका निवेदनाद्वारे भारताची भूमिका स्पष्ट केली. “आम्ही हे अहवाल पाहिले आहेत, ज्यातून पूर्वीपासून माहीत असलेल्या गोष्टींची पुष्टी होत आहे. दहशतवादी नेटवर्कला पाठबळ देणे किंवा संरक्षण देणे यामुळे एखाद्या देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर काय डाग लागतो, याचा विचार संबंधित राष्ट्रांनी करावा,” असे जैस्वाल म्हणाले.

त्यांनी पुढे नमूद केले की, ऑपरेशन सिंदूर ही पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला दिलेली अत्यंत अचूक, मोजकी आणि सुनियोजित प्रतिक्रिया होती, ज्याचा एकमेव उद्देश पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे हा होता.

चिनी इंजिनिअरची खळबळजनक कबुली

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, चीनच्या ‘एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायना’ (AVIC)मधील इंजिनिअर झांग हेंग याने एका मुलाखतीत पाकिस्तानला केलेल्या मदतीचा खुलासा केला आहे.

झांगने सांगितलेले धक्कादायक वास्तव

मे २०२५ मधील भीषण उष्णतेत (५० अंश सेल्सिअस तापमान) चिनी पथक पाकिस्तानी हवाई तळांवर प्रत्यक्ष तैनात होते. पाकिस्तानकडे असलेल्या चीन बनावटीच्या J-10CE लढाऊ विमानांची युद्धकाळातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी चिनी तज्ज्ञ मदत करत होते. “आम्ही तिथे काम करत असताना सतत फायटर जेट्सचे उड्डाण आणि हवाई हल्ल्याच्या सायरनचा आवाज येत असे,” अशी कबुली झांगने दिली आहे. चीनने अद्याप या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.