दहशतवादाच्या विषयावरुन भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. दहशतवाद्यांना मदत करणे तसेच दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानला जागतिक स्तरावर जबाबदार धरण्याची वेळ आल्याचं भारताने म्हटलं आहे. शक्तीचा वापर करुन लोकांकडून हवं ते वदवून घेणं, हत्या करणे आणि राजकीय कार्यकर्ते तसेच अल्पसंख्यांकाना वाटेल त्या पद्धतीने अटक करण्याच्या प्रकरणांचाही भारताने उल्लेख केला.

मंगळवारी जिनेव्हामधील संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमधील एका सत्रात भारताने काश्मीरच्या मुद्द्यावरुन आणि एका वार्षिक अहवालासंदर्भात भाष्य करताना पाकिस्तानवर टीका केली. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या कायमस्वरुपी मोहिमेचे प्रथम सचिव पवन कुमार बाधे यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. “दहशतवाद मानवाधिकारांचे उल्लंघन करतो. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात कठोरपणे लढण्याची आवश्यकता आहे,” असं पवन कुमार बाधे यांनी भारताची भूमिका मांडताना सांगितलं.

“पाकिस्तान आपल्या राष्ट्रीय धोरणांच्या नावाखाली धोकादायक आणि दहशतवादी घोषित करण्यात आलेल्यांना पेन्शन देतो. तसेच या लोकांना पाकिस्तान आश्रय देतो. त्यामुळे आता पाकिस्तानला दहशतवाद्यांना मदत करणे आणि दहशतवादवाढीसाठी जबाबदार ठरवण्याची वेळ आलीय,” असं म्हणत बाधे यांनी पाकिस्तानवर टीका केली. उत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर करत भारताने आपली बाजू मांडली.

आपण पाकिस्तानमधून धार्मिक अल्पसंख्यांक समुदायातील अल्पवयीन मुलींचं अपहरण, बलात्कार आणि जबरदस्तीने केलेलं धर्मांतर तसेच लग्नाच्या बातम्या पाहिल्यात. पाकिस्तानमध्ये दरवर्षी धार्मिक अल्पसंख्यांक समुदायातील एक हजारहून अधिक मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर केलं जात असल्याचंही बाधे यांनी म्हटलं.

इसाई, अहमदिया, शिख, हिंदुसहीत इतर अल्पसंख्यांकाना कठोर अशा ईश्वर निंदेसंदर्भात कायदे, जबरदस्तीने धर्मांतर आणि विवाह तसेच कायदेशीर न्यायव्यवस्थेऐवजी समांतर न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून छळ करणे ही बाब पाकिस्तानमध्ये सामान्य समजली जाते. पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांच्या पवित्र आणि प्राचीन स्थळांवर हल्ले करुन त्यांची तोडफोड करण्याच्या घटनाही घडल्याचं भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन म्हटलं आहे.