पीटीआय, न्यूयॉर्क

भारताने संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर घणाघाती टीका केली असून, पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवादाचा निषेध केला आहे. पाकिस्तानच्या अफगाणिस्तानमधील हवाई हल्ल्यांचाही भारताने निषेध केला असून, ‘नरसंहाराला लष्करी कारवाई संबोधल्याने गुन्हेगार निर्दोष ठरत नाही,’ या शब्दांत पाकिस्तानला सुनावले आहे.

भारताचे संयुक्त राष्ट्रांमधील (यूएन) कायमस्वरुपी सदस्य हरिश पर्वतानेनी यांनी ‘अफगाणिस्तानमधील परिस्थिती’ यावर ‘यूएन’च्या सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘पाकिस्तानच्या अफगाणिस्तानमधील हवाई हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांचा बळी जात असून, लोक त्रस्त आहेत. अशा प्रकारची अक्षम्य हिंसा हा अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून, या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेला धोका आहे. पाकिस्तानची अफगाणिस्तानमधील लष्करी कारवाई हा आंतरराष्ट्रयी कायद्याचा, ‘यूएन’च्या सनदेचा आणि सार्वभौमत्वाच्या तत्त्वाचा भंग आहे.’

भारताची प्रतिक्रिया पाकिस्तानचा प्रतिनिधी ऐकत होता. ‘यूएन’च्या अफगाणिस्तानमधील सहाय्यकारी गटाने दिलेल्या माहितीचा दाखला पर्वतानेनी यांनी दिला. त्यानुसार, या वर्षी पहिल्या तीन महिन्यांत ३७२ नागरिकांचा पाकिस्तानच्या हल्ल्यांत मृत्यू झाला असून, ३९७ जण जखमी झाले आहेत. यातीन बहुतांश मृत्यू पवित्र रमजानच्या काळात झाल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारच्या कृतीचे कदापि समर्थन होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. ‘आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचा एकीकडे उहापोह करायचा आणि इस्लामिक ऐक्याबाबत एकीकडे बोलायचे आणि दुसरीकडे रमजानच्या पवित्र महिन्यात हल्ले करायचे हे ढोंगीपणाचे उत्तम उदाहरण आहे,’ असे ते म्हणाले.

‘‘पीओके’मधील क्रौर्यासाठी पाकिस्तान जबाबदार’

नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नागरिकांवर पाकिस्तान करीत असलेल्या अन्यायाचा भारताने मंगळवारी तीव्र शब्दांत निषेध केला आणि येथील गैरकृत्यांबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला जबाबदार धरावे, असे आवाहन केले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधात ठिकठिकाणी आंदोलन होत असून, आंदोलकांविरोधात करण्यात आलेल्या पोलीस कारवाईत विविध ठिकाणी २० जणांचा मृत्यू झाला. परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्ताची दखल घेऊन पाकिस्तानचा निषेध केला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, ‘अशा प्रकारची कारवाई म्हणजे पाकिस्तानचे अपयश झाकण्याचे आणि येथे होत असलेल्या मानवी हक्क उल्लंघनापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न आहेत.