Donald Trump India Hellhole Remark and India’s official diplomatic protest : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख ‘नरक’ असा करणारी एक पोस्ट केल्यानंतर गुरूवारी भारताने या विधानावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. अशी विधाने ही अपुऱ्या माहितीवर अधारित आणि अयोग्य असल्याचे भारताने म्हटले आहे. इतकेच नाही ही विधाने अमेरिका आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचे खरे स्वरूप दर्शवत नाहीत, असेही भारताने म्हटले आहे.
माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारताकडून सोशल मीडियावरील मूळ विधान आणि अमेरिकन दूतावासाने जारी केलेले स्पष्टीकरण या दोन्हीची दखल घेण्यात आली आहे.
“आम्ही ते विधाने आणि त्या संदर्भात अमेरिकन दूतावासाने जारी केलेले स्पष्टीकरण पाहिले आहे. ही विधाने निश्चितपणे अपुऱ्या माहितीवर आधारित, अयोग्य आणि आक्षेपार्ह आहेत. दीर्घकाळापासून परस्पर आदर आणि सामायिक हित यावर आधारित भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचे वास्तव ती नक्कीच दर्शवत नाहीत,” असे जयस्वाल म्हणाले.
अमेरिकेतील जन्मजात नागरिकत्वाच्या कायद्यावर टीका करताना कन्झर्व्हेटिव्ह रेडिओ होस्ट मायकल सॅव्हेज यांनी भारत आणि चीनचा उल्लेख ‘नरक’ (हेलहोल) असा केला होता. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर सॅव्हेज यांचा हा व्हिडीओ आणि त्याची ट्रान्सक्रिप्ट रीपोस्ट केली. यानंतर वादाला तोंड फुटल्याचे पाहायला मिळाले.
सॅव्हेज नेशन पॉडकास्टमध्ये सॅव्हेज यांनी नादगरिकत्व कायद्यावर टीका केली. या कायद्यामुळे अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या बहुतेक मुलांना नागरिकत्व दिले जाते, मग त्यांच्या पालकांकडे अधिकृत कागदपत्रे नसली किंवा ते देशात तात्पुरते वास्तव्यास असले तरीही त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळते. भारत आणि चीनसारख्या देशांतील स्थलांतरित या धोरणाचा गैरफायदा घेत असल्याचा दावा त्यांनी केला.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या विधानात, सॅव्हेज म्हणाले होते की अमेरिकेत जन्मलेले मूल तात्काळ अमेरिकेचा नागरिक बनते आणि पुढे जाऊन तो भारत आणि चीन सारख्या देशांतील आपल्या कुटुंबातील सदस्याना अमेरिकेत स्थलांतर करण्यास मदत करते.
“येथे जन्मलेले मूल तात्काळ नागरिक बनते आणि त्यानंतर ते चीन किंवा भारत किंवा पृथ्वीवरील इतर कोणत्याही नरकातून आपल्या संपूर्ण कुटुंबाला येथे घेऊन येतात,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांनी पाडकास्टची ट्रान्सक्रिप्ट आणि व्हिडीओ दोन्ही रिपोस्ट केले आहे.
यापूर्वी आजच भारताने थेट ट्रम्प यांच्यावर टीका न करता आपली नाराजी व्यक्त केली होती. या वादाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना रणधीर जयस्वाल म्हणाले होते की, “आम्ही काही रिपोर्ट्स पाहिले आहेत. मी फक्त इतकेच सांगेन.”
ट्रम्प यांच्या विधानानंतर काही तासांत अमेरिकन दूतावासाने गोष्टी सावरून घेण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “राष्ट्राध्यक्ष म्हणाले आहेत की, भारत हा एक महान देश असून तिथल्या सर्वोच्च पदावर माझे एक अत्यंत चांगले मित्र आहेत.”
