चार हजार किमी अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद करणाऱ्या अण्वस्त्रसज्ज अग्नी-४ या क्षेपणास्त्राची सोमवारी येथे घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली.  येथील व्हीलर बेटांवरून अग्नी-४ची चाचणी घेण्यात आली. सकाळी १० वाजून ५२ मिनिटांनी क्षेपणास्त्र झेपावले. याआधी या क्षेपणास्त्राची गेल्या वर्षी १९ सप्टेंबरला पहिली चाचणी घेण्यात आली होती. अग्नी क्षेपणास्त्र मालिकेतील हे चौथे अस्त्र असून सोमवारच्या चाचणीनंतर ते लष्करात समाविष्ट होण्यासाठी सज्ज झाले आहे. अग्नी-४ च्या यशामुळे देशाच्या संरक्षणसिद्धतेत अधिकच भर पडली आहे.

वैशिष्टय़े
* कम्पोझीट घनइंधन रॉकेट मोटर तंत्रज्ञानाचा अवलंब
* रिंग लेसर गायरो व मायक्रो नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर
* एव्हिऑनिक्स तंत्रज्ञानाचा वापर
* रोड मोबाइल लाँचरवरून उड्डाण
* रडार, इलेक्ट्रो ऑप्टिकल यंत्रणांच्या मदतीने चाचणी निरीक्षण
* चार हजार किमी अंतरावरील अचूक लक्ष्यभेद

अग्नी-४च्या यशस्वीतेसाठी संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) सर्वच अधिकारी व तंत्रज्ञ कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन.
– ए. के. अँटोनी, संरक्षणमंत्री