वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताने आपल्या अण्वस्त्रक्षमतेचे प्रदर्शन करत, अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुडीतून मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. मंगळवार, २३ डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम किनारपट्टीवर ‘आयएनएस अरिघात’ या पाणबुडीतून ‘के-४’ क्षेपणास्त्राची ही चाचणी घेण्यात आली.
३,५०० किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे भारताच्या समुद्री अण्वस्त्र हल्लाक्षमतेत मोठी वाढ झाली आहे. या यशस्वी चाचणीमुळे भारताने आपली अण्वस्त्रशक्ती, विशेषतः सागरी क्षेत्रातील ताकद अधिक मजबूत केली आहे. २९ ऑगस्ट २०२४ रोजी के-४ क्षेपणास्त्र अधिकृतपणे भारतीय नौदलात सामील करण्यात आले. यामुळे जमीन, हवा आणि समुद्रातून अण्वस्त्रे डागण्याची क्षमता असलेल्या निवडक देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.
हे क्षेपणास्त्र जमिनीवरून डागल्या जाणाऱ्या ‘अग्नी-३’ क्षेपणास्त्राच्या धर्तीवर विकसित करण्यात आले आहे. समुद्रातून डागता येणारे हे भारताचे आतापर्यंतचे सर्वात लांब पल्ल्याचे धोरणात्मक शस्त्र आहे. पाणबुडीतून प्रक्षेपणासाठी या क्षेपणास्त्राची विशेष रचना करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र प्रथम पाण्याखालून वर येते, पृष्ठभाग ओलांडते आणि त्यानंतर त्याचे रॉकेट इंजिन प्रज्वलित होऊन लक्ष्याकडे झेपावते. क्षेपणास्त्रांच्या या ‘के’ मालिकेचे नाव भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले.
के-४ क्षेपणास्त्र २.५ टनांपर्यंतचे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. हे भारताच्या ‘अरिहंत’ श्रेणीतील पाणबुड्यांवरून डागता येते. अरिहंत श्रेणीतील पाणबुड्या समुद्राच्या खोलवर गुप्तपणे राहू शकतात, ज्यामुळे भारताचा हा अण्वस्त्र भाग सर्वात सुरक्षित आणि शत्रूच्या मागापासून दूर मानला जातो.
