इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील वाढत्या संघर्षामुळे संयुक्त राष्ट्रांमध्ये रविवारी चर्चा करण्यात आली. या चर्चेत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रविवारी भारताने गाझा येथील रॉकेट हल्ल्यांमुळे होत असलेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. मध्यपूर्वेत सुरु असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीवर चर्चेदरम्यान, भारताचे संयुक्त राष्ट्र संघाचे स्थायी प्रतिनिधी राजदूत टी एस तिरुमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका मांडली. सध्या चालू असलेल्या हिंसाचारामुळे मोठी हानी झाली आहे आणि त्यात महिला आणि बालकांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

“आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याची आणि तणाव वाढवणाऱ्या कारवाया रोखण्याचे आवाहन करत आहोत.” पूर्व जेरूसलेम व त्याच्या सभोवतालच्या सध्याच्या स्थितीत एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न टाळण्याचे आवाहन तिरुमूर्ती यांनी सुरक्षा समितीला केले आहे.

पॅलेस्टाईनमधील हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यात इस्त्रायलमधे राहणाऱ्या सौम्या संतोष या भारतीय महिलेला प्राण गमवावे लागले होते. शनिवारी केरळ येथे सौम्या यांचे पार्थिव आणण्यात आले. या महिलेसह मृत्यूमुखी पडलेल्या इतर नागरिकांच्या निधनावर भारत शोक करतो असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या राजदूतांनी सांगितले.

तिरुमूर्ती यांनी दोन्ही देशांमध्ये थेट संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी आणि त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचे आवाहन केले. पॅलेस्टाइनच्या मागण्यांना भारताचा पाठिंबा असून दुहेरी राष्ट्राच्या सिद्धांतानुसार तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी केली.

“जेरुसलेमला दरवर्षी शहराला भेट देणाऱ्या लाखो भारतीयांच्या मनात एक विशेष स्थान आहे. ओल्ड सिटीमध्ये अल झविय्या अल हिंदीया या भारतीय धर्मशाळेत एक महान भारतीय सुफी संत बाबा फरीद यांच्याशी संबंधित असल्याने त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारताने ही धर्मशाळा पुन्हा बांधली आहे. केली आहे, ”असे तिरुमूर्ती यांनी सांगितले.

पॅलेस्टिनींना जेरूसलेमच्या बाहेर काढण्यासाठी ज्यूंच्या हालचाली वाढल्या असल्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले.

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात रविवारी गाझामध्ये ४२ जण ठार झाले असून तीन इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. याशिवाय या हल्ल्यांमध्ये इतर पन्नास जण जखमी झाले आहेत.