सुरक्षा मंडळ अध्यक्षपदाची भारताची मुदत संपुष्टात

अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत लिंडा थॉमस यांनी भारताचे अभिनंदन केले.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षपदी भारताची एक महिन्याची मुदत संपुष्टात आली असून जागतिक पातळीवर भारताने या काळात चांगला ठसा उमटवला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता बळकावल्यानंतर तेथे दहशतवाद्यांना आश्रय देण्यात येऊ नये, असा इशारा देणारा ठराव भारताच्या पुढाकाराने संमत करण्यात आला.

भारताची सुरक्षा मंडळ अध्यक्षपदाची कारकीर्द संपली असली तरी अजून भारत संयुक्त राष्ट्रांचा अस्थायी सदस्य म्हणून दोन वर्षे काम करणार आहे. सुरक्षा मंडळाचे अध्यक्षपद सतत फिरते राहते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे हे अध्यक्षपद ऑगस्टमध्ये भारताकडे होते. भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत टी.एस तिरुमूर्ती यांनी सुरक्षा मंडळात सहकार्य केल्याबाबत सर्व सहकारी देशांचे अभिनंदन केले आहे.

अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत लिंडा थॉमस यांनी भारताचे अभिनंदन केले. भारताचे नेतृत्व अनेक आव्हानातही उठून दिसले; विशेष करून अफगाणिस्तानबाबत जी खंबीर भूमिका भारताने घेतली ती प्रशंसनीय होती असे त्यांनी म्हटले आहे. भारताने ठराव क्रमांक १२६७ मांडला होता. तो भारतासाठी महत्त्वाचा ठरला होता.

भारताच्या अध्यक्षीय कारकिर्दीत सागरी सुरक्षेबाबतचाही ठराव मांडण्यात आला होता. सुरक्षा मंडळात या विषयावर सविस्तर चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वेळी प्रथमच अध्यक्षीय निवेदन प्रसारित करण्यात आले.

१८ व १९ ऑगस्ट रोजी भारताच्या नेतृत्वाखाली शांतता, रक्षण व तंत्रज्ञान तसेच आयसिस व दाएश यांच्याबाबतचे निवेदन या दोन विषयांवर बैठका झाल्या, त्या वेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते.

भारतात मुंबईमध्ये सागरी मार्गाने झालेला दहशतवादी हल्ला लक्षात घेऊन सागरी सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सागरी मार्गाने होणाऱ्या दहशतवादी कारवाया व इतर सुरक्षा आव्हाने पेलण्याची गरज असून त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे, तसेच चाचेगिरीला आळा घालणे गरजेचे आहे. –  टी.एस तिरुमूर्ती, भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India term as security council president expires akp

ताज्या बातम्या