नवी दिल्ली : भारताने सोमवारी रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र हेलिनाची पोखरण येथे यशस्वीरित्या चाचणी केली. स्वदेशी बनावटीच्या आधुनिक हलक्या हेलिकॉप्टरमधून ही चाचणी करण्यात आली. हेलिना हे जगातील सर्वात आधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र असल्याची माहिती डीआरडीओतर्फे (संरक्षण संशोधन विकास संस्था) देण्यात आली.
हेलिनाची कमाल पल्ल्याची क्षमता ही सात किलोमीटर आहे. त्याची रचना ही शस्त्रास्त्रयुक्त आधुनिक हलक्या हेलिकॉप्टरसाठी (एएलएच ) करण्यात आली आहे. सोमवारी घेण्यात आलेली ही चाचणी डीआरडीओने विकसित केलेल्या तिसऱ्या पिढीतील फायर अॅन्ड फरगेट म्हणजेच डागा आणि विसरा श्रेणीतील क्षेपणास्त्रांच्या वापरसिद्धता चाचण्यांचा भाग होती.