नवी दिल्ली : भारताने बुधवारी ओडिशाच्या किनाऱ्यावर कमी वेळात दोन ‘प्रलय’ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली, ज्यामुळे त्यांचा सशस्त्र दलात समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली.प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून ज्याची भारक्षमता ५०० ते १,००० किलो आहे. ते अनेक पारंपरिक शश्त्रास्त्रेही वाहून नेण्यासह १५० ते ५०० किमीपर्यंत लक्ष्य पूर्ण करण्यास सक्षम आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी क्षेपणास्त्र प्रक्षेपणाबद्दल डीआरडीओ, भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि उद्योगाचे अभिनंदन केले. क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे क्षेपणास्त्राची विश्वासार्हता सिद्ध झाली आहे, असे ते म्हणाले. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनीही क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या डीआरडीओचे अभिनंदन केले आणि ही कामगिरी वापरकर्त्यांसह प्रणालीच्या समावेशासाठी त्वरित तयारी दर्शवते, असे सांगितले.
‘प्रलय’ हे स्वदेशी बनावटीचे विकसित अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे उच्च अचूकता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज आहे. ही स्वदेशी विकसित शस्त्र प्रणाली आहे ज्यामध्ये उच्च अचूकता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली आहे. संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, ही उड्डाण चाचणी मूल्यांकन चाचण्यांचा भाग म्हणून घेण्यात आली.
