फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासह भारताला हवे असलेले दहशतवादी हफीझ सईद व झकीउर रहमान लख्वी या तिघांचीही मालमत्ता जप्त करण्याचे पाकिस्तानला आवाहन करण्याचा भारत विचार करत आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अल-कायदा आणि तालिबान प्रतिबंध समितीने दाऊद इब्राहिम, लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीझ सईद आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार लख्वी या तिघांवर बंदी घातली आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य देश म्हणून त्यांची मालमत्ता गोठवणे ही पाकिस्तानची जबाबदारी असल्याचे भारताचे म्हणणे आहे.
या तिघांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे की नाही, आणि नसेल तर ती तत्काळ गोठवावी हे सांगण्यासाठी औपचारिक पत्र पाठवण्याची आमची योजना आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. हे पत्र राजनैतिक माध्यमातून पाठवले जाणे अपेक्षित आहे.
१९९३च्या मुंबई बाँबस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी दाऊद हा पाकिस्तानमध्ये असल्याचे भारत सांगत आलेला आहे. हफीझ हा पाकिस्तानात मुक्तपणे संचार करत आहे, तर गेल्या महिन्यात रावळपिंडी तुरुंगातून सुटलेला लख्वी हा सध्या त्या देशातच राहात आहे.