भारताला एमटीसीआरचे सदस्यत्व देण्याचे सोपस्कार अखेर पूर्ण

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताने आज सकाळी अधिकृतरीत्या एमटीसीआर व्यवस्था स्वीकारली.

भारताने आज अधिकृतपणे क्षेपणास्त्र नियंत्रण कराराच्या (एमटीसीआर) कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या असून जागतिक अण्वस्त्र प्रसारबंदीसाठीच्या निकषांसाठी ही बाब फायद्याची आहे असे सांगण्यात आले. भारत आता एमटीसीआरचा पूर्ण सदस्य झाला आहे. बहुदेशीय निर्यात नियंत्रण व्यवस्थेत भारताने प्रथमच प्रवेश केला असून परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी एमटीसीआरच्या कागदपत्रांवर फ्रान्सचे नियोजित राजदूत अ‍ॅलेक्झांडर झिगलर यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या केल्या. नेदरलँडचे राजदूत अल्फान्सस स्टोलिंगा व लक्झेमबर्गचे राजदूत लॉरी हुबर्टी यावेळी उपस्थित होते.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताने आज सकाळी अधिकृतरीत्या एमटीसीआर व्यवस्था स्वीकारली. भारताचा या व्यवस्थेत प्रवेश झाल्याने एमटीसीआरच्या सदस्यांची संख्या आता ३५ झाली आहे. अण्वस्त्रप्रसारबंदीच्या कामी ही व्यवस्था विशेष उपयोगी ठरणार आहे. एमटीसीआरच्या भागीदार देशांचे भारताने पाठिंब्यासाठी आभार मानले आहेत. नेदरलँड्सचे राजदूत पीटर डी क्लर्क व लक्झेमबर्गचे एमटीसीआर सहअध्यक्ष रॉबर्ट स्टेनमेटझ यांचे आम्ही आभार मानतो. एमटीसीआरच्या पॅरिसमधील संपर्कप्रमुखांनी फ्रान्स दूतावासाच्या मार्फत भारताला प्रवेश देण्यात आल्याचे कळवले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India to become full member of mtcr today