अमेरिका-इस्रायल आणि इराण या देशांमध्ये संघर्ष सुरू असतानाच भारताने आपली हवाई सुरक्षा यंत्रणा आणखी मजबूत करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. भारत रशियन एस-४०० (S-400) हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या आणखी पाच स्क्वॉड्रन खरेदी करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान एस-४०० प्रणालीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक पाकिस्तानी विमाने रोखल्याबद्दल आणि ते हाणून पाडल्याबद्दल या प्रणालीच कौतुक झाले होते.

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने इराणच्या विरोधात ‘ऑपरेशन फ्युरी’ ही मोहिम सुरू केली आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर इराणने प्रत्युत्तर देत इस्रायलसह अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या देशांवर जोरदार हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेत मोठा संघर्ष सुरू आहे. या सर्व घडामोडींदरम्यान भारत ही क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाचा एस-४०० प्रणालीच्या आणखी पाच स्क्वॉड्रन खरेदी करण्याचा प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी सादर केला जाईल. भारताचे बहुस्तरीय हवाई संरक्षण नेटवर्क आणखी मजबूत करण्यासाठी ही प्रणाली पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही सीमांवर तैनात केली जाणे अपेक्षित आहे. भारताकडे सध्या तीन एस-४०० प्रणाली आहेत, तर रशियाबरोबर २०१८ मध्ये झालेल्या पाच स्क्वॉड्रनच्या करारानुसार, या वर्षी आणखी दोन प्रणालींचा त्यामध्ये समावेश होणार आहे.

ही प्रणाली का खास आहे?

पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांविरुद्ध भारताच्या लष्करी कारवाईदरम्यान, म्हणजेच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने प्रथमच एस-४०० चा यशस्वीपणे वापर केला. भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील एअरबेस, रडार केंद्र आणि कमांड-अँड-कंट्रोल सेंटर्सना लक्ष्य केले होते. यावेळी पाकिस्तानी लढाऊ विमाने, एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्ट आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म यांना प्रभावीपणे काम करण्यापासून रोखल्याचे श्रेय भारतीय हवाई दलाने एस-४०० प्रणालीला दिले होते. तसेच अधिकार्‍यांनी सांगितले की, या प्रणालीने पाकिस्तानकडून डागण्यात आलेली क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रेही देखील यशस्वीपणे रोखली.

भारतीय हवाई दल आता हवाई आणि क्षेपणास्त्र धोक्यांपासून बचावासाठी एस-४०० इंटरसेप्टर्सची संख्या वाढवण्याच्या विचारात आहे. रशियासोबत यावर चर्चा सुरू असून, लवकरच नवीन टेंडर काढले जाण्याची अपेक्षा आहे. दुसर्‍या देशांकडून खरेदी करण्याबरोबरच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ‘प्रोजेक्ट कुशा’ अंतर्गत एका स्वदेशी लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीवर काम करत आहे.