अफगाणिस्तानमधील परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने, १० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे NSA स्तरावरील प्रादेशिक परिषद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भारत या बैठकीचे यजमानपद भूषवणार असून एनएसए अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

या संवादात भारताच्या निमंत्रणाला खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे.  मध्य आशियाई देश तसेच रशिया आणि इराणने त्यांच्या सहभागाची पुष्टी केली आहे. केवळ अफगाणिस्तानच्या जवळचे शेजारीच नव्हे तर सर्व मध्य आशियाई देश या संवादात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अफगाणिस्तान धोरणावर भारताचे हे मोठे यश मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक अफगाणिस्तानातील परिस्थितीबद्दल प्रादेशिक देशांची व्यापक आणि वाढती चिंता, एकमेकांशी सल्लामसलत आणि समन्वय साधण्याची इच्छा, यावर लक्ष केंद्रित करेल. या प्रक्रियेत भारताची भूमिका महत्त्वाची आहे. याआधीच्या दोन बैठका सप्टेंबर २०१८ आणि डिसेंबर २०१९ मध्ये इराणमध्ये झाल्या आहेत. तिसरी बैठक भारतात होणार होती. मात्र, कोरोनामुळे ती होऊ शकली नाही.

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताने आयोजित केलेल्या या बैठकीत चीन, रशिया, इराण आणि इतर देशांसह पाकिस्तानलाही आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अलीकडेच पाकिस्तानने भारताचे निमंत्रण फेटाळले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी १० नोव्हेंबर रोजी भारताने अफगाणिस्तानवर बोलावलेल्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री कार्यालयाने भारताचे निमंत्रण स्वीकारले होते.