सध्याची पाकिस्तानची अवस्था बिकट आहे. पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींना सामोरा जातो आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर आता भारताने बुधवारी पाकिस्तानला निमंत्रण दिलं आहे. गोव्यात होणाऱ्या SCO शांघाय शिखर संमेलनासाठी भारताने हे निमंत्रण दिलं आहे. परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारताने पाकिस्तानला निमंत्रण दिलं आहे. आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं की भारतातर्फे बिलावल भुट्टो यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पाकिस्तानने या बैठकीला उपस्थित राहणार की नाही याबाबत निश्चित काहीही सांगितलेलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बैठकीचं प्रतिनिधीत्व भारताकडे

गोव्यात होणाऱ्या SCO बैठकीचं प्रतिनिधीत्व भारताकडे आहे. ही बैठक ४ आणि ५ मे या दोन दिवशी होणार आहे. पाकिस्तानने जर हे निमंत्रण स्वीकारलं तर १२ वर्षांनी पाकिस्तानचा बडा नेता भारतात येणार आहे. याआधी माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी या २०११ मध्ये भारत दौऱ्यावर आल्या होत्या. चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उजबेकिस्तान हे देश या SCO चे सदस्य आहेत. चीनने या बैठकीसाठी रशियासह काही मध्य आशियाई देशांनाही निमंत्रण दिलं आहे. मात्र या बैठकीसाठी भारताने पाकिस्तानला दिलेलं निमंत्रण चर्चेत आहे.

शाहबाज शरीफ यांनी काय म्हटलं होतं?

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आम्हाला युद्ध करायचं नाही तो मार्ग आम्हाला स्वीकारायचा नाही. त्याऐवजी आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे त्याद्वारे आमच्या देशात (पाकिस्तान) प्रगती कशी होईल ते पाहायचं आहे. भारतासोबत आत्तापर्यंत जी युद्धं आम्ही केली त्यातून आम्ही धडा घेतला आहे असंही शरीफ यांनी म्हटलं आहे.

आठ वर्षांपासून भारत पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण

मागच्या आठ वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले संबंध तणावाचे राहिले आहेत. अशात आता पाकिस्तानची सद्यस्थिती प्रचंड बिकट झाली आहे. पाकिस्तान कंगालीच्या खाईत रोज थोडा थोडा खाली जातो आहे. सौदी अरबकडे पाकिस्तानने नुकतीच मदतीची याचना केली होती. तसंच इतर देशांकडेही पाकिस्तानने कर्ज मागितलं होतं. अशात भारताने पाकिस्तानला दिलेलं निमंत्रण हे चर्चेचा विषय ठरलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India to invite pakistan pm shehbaz sharif to high level sco meet in goa scj
First published on: 26-01-2023 at 11:54 IST