संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. भारताची तिन्ही सैन्य दले रशियाच्या विजयी परेडमध्ये सहभागी होणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने राजनाथ सिंह रशियाकडे तात्काळ सुट्टया भागांचा पुरवठा करण्याची मागणी करणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील फायटर विमाने आणि भारतीय लष्कराच्या मुख्य रणगाडयांसाठी सुट्टया भागांची आवश्यकता आहे. या सुट्टया भागांचा तात्काळ पुरवठा करण्याची मागणी रशियाकडे केली जाणार आहे.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये तणाव मोठया प्रमाणात वाढला आहे. चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर दोन्ही देशांनी सैन्य तैनाती केली आहे. हवाई मार्गाने लवकरात लवकर हे सुट्टे भाग आणि उपकरणे पोहोचवण्याची विनंती रशियाला करण्यात येणार आहेत. उद्या वेळ आली आणि गरज पडली तर या उपकरणांचा वापर करण्यात येईल. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

सीमेवर चीनच्या कुठल्याही आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने सर्व सज्जता ठेवली आहे. सैन्य तुकडयांच्या तैनातीबरोबर आणि युद्धसाहित्यही वापरासाठी तयार आहे. सुखोई-३० एमकेआय आणि टी-९० रणगाडयासाठी सुट्टया भागांची आवश्यकता आहे. उद्या गेमचेंजर ठरु शकतील अशी ही भारताची दोन महत्वाची शस्त्रे आहेत. समुद्र मार्गाने हे सुट्टे भाग पोहोचवले जातात. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता तात्काळ विमानाने हे भाग पोहोचवण्याची भारताची मागणी आहे.

भारत आणि रशियामध्ये घनिष्ठ मैत्री आहेच. पण रशियाने सुरुवातीपासूनच संरक्षण क्षेत्रात भारताला मोठे सहकार्य केले आहे. भारताच्या ताफ्यातील बहुतांश शस्त्रास्त्रे ही रशियन बनावटीची आहेत. त्यामुळे यांच्या सुट्टया भागांसाठी भारताला रशियाची गरज लागते. एस-४०० सिस्टिमही लवकरात लवकर मिळवण्याचे भारताचे प्रयत्न आहेत.