देशात गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे २६ हजार ९६४ नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ३८३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचसोबत, मार्च २०२० नंतर आता सर्वाधिक म्हणजे ९७.७७ टक्के रिकव्हरी रेटची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब अशी कि, गेल्या २४ तासांत देशात तब्बल ३४ हजार १६७ लोक करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे, आतापर्यंत एकूण करोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी २७ लाख ८३ हजार ७४१ वर पोहोचली आहे.

देशाचा दैनंदिन करोना पॉझिटिव्हिटी रेट सध्या १.६९ टक्के इतका आहे. गेल्या २३ दिवसांपासून हा पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांच्या खाली आला आहे. देशाच्या करोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाविषयी माहिती जाणून घ्यायची झाल्यास गेल्या २४ तासात देशात ७५ लाख ५७ हजार ५२९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण ८२ कोटी ६५ लाख १५ हजार ७५४ नागरिकांचं लसीकरण झालं आहे.

दिलासादायक! आर-व्हॅल्यू १ च्या खाली

देशात करोनासंदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतात करोनाची आर-व्हॅल्यू १ पेक्षा देखील कमी झाली आहे. ‘आर-व्हॅल्यू’ हे एक मानक आहे जे करोना संसर्गाचा वेग दर्शवते. शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की, ऑगस्टच्या अखेरीस ही ‘आर-व्हॅल्यू’ १.१७ होती. सप्टेंबरच्या मध्यात ही १ च्या खाली येऊन ०.९२ इतकी झाली. याचाच अर्थ, देशभरात संक्रमणाचा वेग मंदावला आहे. मात्र, काही प्रमुख शहरं उदा. मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरूमध्ये आर-व्हॅल्यू १ पेक्षा जास्त आहेत. तर, दिल्ली आणि पुण्यात आर-व्हॅल्यू १ च्या खाली आहेत. राज्यांचा विचार करता महाराष्ट्र आणि केरळमध्ये आर-व्हॅल्यू १ च्या खाली आली आहे.

सलग चार दिवस दिल्लीत करोनामुळे एकही मृत्यू नाही

देशाच्या राजधानी दिल्लीत करोनामुळे चौथ्या दिवशी एकही मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत दिल्लीमध्ये २५ हजार ८५ लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (२२ सप्टेंबर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत गेल्या २४ तासांत करोनाची ३९ नवीन प्रकरण नोंदवण्यात आली आहेत. करोना संसर्गाचा दर ०.०६ टक्क्यांवर गेला आहे. सध्या दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या ४०० आहे.