अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे बिंग फोडणारा एडवर्ड स्नोडेन याने आश्रय देण्याची भारताकडे केलेली मागणी केंद्र सरकारने फेटाळली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्नोडेनने केलेली मागणी मंगळवारी दुपारी फेटाळली.
भारतासह एकूण २० देशांकडे आश्रय देण्याची मागणी स्नोडेनने केली. स्नोडेनने हाँगकाँगहून पोबारा केल्यानंतर तो रशियात आला. तेथून तो हवानामार्गे इक्वेडोरला जाणे अपेक्षित असताना तो गेलाच नाही. गेले चार दिवस तो मॉस्को विमानतळाजवळच वास्तव्यास आहे.
विकीलीक्सचे कायदा सल्लागार सराह हॅरिसन यांनी स्नोडेनसाठी वेगवेगळ्या देशांमध्ये अर्ज करून त्याला आश्रय देण्याची मागणी केलीये. सुरुवातीला इक्वेडोर आणि त्यानंतर आईसलॅंडकडे आश्रय देण्याची मागणी करण्यात आली होती. सराह हॅरिसन यांनी स्नोडेनला आश्रय देण्यासाठी वेगवेगळ्या देशांकडे विनंती अर्ज पाठविल्याचे विकीलीक्सने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
स्नोडेनवर अमेरिकी सरकार कारवाई करण्याच्या तयारीत असल्याने त्याला आश्रय देण्यात यावा, अशी मागणी अर्जामध्ये करण्यात आली.