India UN slams Pakistan: पाकिस्तान सरकारने एजन्सींना काही विशिष्ट गटांचा उल्लेख ‘फितना अल-हिंदुस्तान’ असा करण्याचे आदेश दिले आहेत, या आदेशाचा भारताने तीव्र शब्दात निषेध करत पाकिस्तानच्या लष्करी उठावाचा देखील पर्दाफाश केला. ​संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत हरीश पर्वथनेनी यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान कशाप्रकारे चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीला धार्मिक रंग देत आहे हे देखील पर्वथनेनी यांनी अधोरेखित केले.

काय म्हणाले पर्वथनेनी?

“हा पाकिस्तानच्या छुप्या लष्करी प्रभावातून चालवल्या जाणाऱ्या द्वेषाचा संघटित परिणाम आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारताविरुद्ध कायम शत्रुत्वाच्या छायेत ठेवणे, हाच यामागचा उद्देश आहे. यामुळे त्यांना सत्ता आणि देशाच्या संसाधनांवर स्वतःचे नियंत्रण कायम ठेवता येईल. शिवाय, नागरिकांचे लक्ष देशातील मुख्य राजकीय आणि आर्थिक समस्यांवरून विचलित करता येईल,” असे हरीश पर्वथनेनी पाकिस्तानला फटकारताना म्हणाले.

‘फितना अल-हिंदुस्तान’वर आक्षेप

​पाकिस्तान सरकारने २०२५ मध्ये बलुचिस्तान प्रांतात सक्रिय असलेल्या सर्व दहशतवादी गटांना आणि संघटनांना अधिकृतपणे ‘फितना अल-हिंदुस्तान’ म्हणून घोषित केले होते. दरम्यान, संयुक्त राष्ट्रात भारताने पाकिस्तानच्या या निर्णयाचा स्पष्ट शब्दांत धिक्कार करत धार्मिक शब्दांच्या आडून चुकीची व दिशाभूल करणारी माहिती असल्याचे सांगत ती फेटाळून लावली. भारताने यावेळी अफगाणिस्तानवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा देखील तीव्र शब्दात निषेध केला. निष्पाप नागरिकांची हत्या करणे, त्यांना अपंग करणे किंवा अनाथ करणे याला दहशतवादविरोधी कारवाई म्हणता येत नाही, असे पर्वथनेनी म्हणाले.

लष्कराकडून सत्तापालट

भारताने पाकिस्तानाला फटकारताना तेथील लष्करी सत्तापालटाचा संदर्भ दिला. पर्वथनेनी यांचा रोख असीम मुनीर यांच्याकडे होता. मुनीर यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातील आदेशांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि जलद निर्णय घेण्यासाठी २७ व्या घटनादुरुस्तीच्या मंजुरीनंतर सीडीएफ हे पद निर्माण करण्यात आले आहे. दरम्यान, ​”पाकिस्तानला आपल्या अपयशाचे खापर शेजारील देशांवर फोडण्याची जुनी सवय आहे. त्यांचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत”, असे पर्वथनेनी म्हणाले.