संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताचे सडेतोड प्रत्युत्तर

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उपस्थित केलेल्या काश्मीरच्या मुद्द्यावर भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी, ‘‘पाकिस्तानात दहशतवाद्यांना खुलेआम आश्रय मिळतो, जागतिक दहशतवादी ओसामा बिन लादेन यानेही तेथेच आश्रय घेतला होता,’’ असे सडेतोड प्रत्युत्तर दिले.  

पाकिस्तान प्रत्यक्षात शांततेचा पुरस्कर्ता असल्याचा आव आणीत असला तरी तो आग लावणारा देश आहे, असे स्नेहा दुबे यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या निदर्शनास आणले. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय दिल्यामुळे जगाचे मोठे नुकसान झाल्याचेही त्या म्हणाल्या.

भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारा संविधानातील अनुच्छेद ३७० रद्द केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान यांनी टीका करताना पाकिस्तानवादी नेते सय्यद अली शहा गिलानी यांच्या मृत्यूचा उल्लेख केला होता. त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देताना दुबे म्हणाल्या की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग असून त्यात पाकिस्तानने बेकायदा कब्जा केलेल्या काही भागांचाही समावेश आहे. पाकिस्तानने त्या भागांवरचा ताबा सोडावा.

पाकिस्तानी नेत्यांनी भारताचा अंतर्गत प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत उपस्थित करून प्रतिमाहनन करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याला उत्तर देण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे स्पष्ट करीत दुबे म्हणाल्या की, सतत खोटारडेपणा करणाऱ्यांना कुणाचीही सहानुभूती मिळणार नाही. पाकिस्तान हा दहशतवादाचा तडाखा बसलेला देश आहे, असे आम्ही बराच काळ ऐकत आलो, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असून पाकिस्तानच आग भडकवण्याचे कृत्य करून आपण शांतताप्रिय असल्याचा आव आणत धादांत खोटे बोलत आहे, अशी टीकाही भारताने केली. 

पाकिस्तानने भारताला त्रास देण्यासाठीच दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे. भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला त्यामुळे फटका बसला आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणे हा पाकिस्तानने त्याच्या धोरणाचाच एक भाग केला आहे, असे ही भारताने नमूद केले.    पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा गैरवापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेकदा त्याने असे केले आहे. संयुक्त राष्ट्रांत भारतविरोधी अपप्रचार केला आहे. पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान आहे. तेथे अल्पसंख्याकांना जगणे मुश्कील झाले आहे, असेही भारताने जागतिक नेत्यांच्या निदर्शनास आणले.

पाकिस्तान हा दहशतवादाचा तडाखा बसलेला देश आहे, आम्ही बराच काळ ऐकत आलो, पण प्रत्यक्षात पाकिस्तानच आग भडकवण्याचे कृत्य करून आपण शांतताप्रिय असल्याचा आव आणत आहे.   – स्नेहा दुबे, भारताच्या प्रथम सचिव