पीटीआय, टोक्यो : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची मंगळवारी भेट झाली. दोन्ही देशांनी त्यांच्या अग्रगण्य सुरक्षा दलांसाठी विकसित होणाऱ्या तांत्रिकदृष्टय़ा प्रगत व गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानात सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाच्या भागीदारीची घोषणा या वेळी केली. मोदी व बायडेन या दोन्ही नेत्यांनी या वेळी अधिक समृद्ध, संपन्न, सुसंवादी, सुरक्षित, मुक्त व परस्परांशी दृढ संबंध असलेल्या विश्वासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प केला. 

जपानमध्ये भारत-अमेरिका-ऑस्ट्रेलिया व जपानदरम्यान ‘क्वाड’ परिषद सुरू आहे. यानिमित्त येथे उपस्थित असलेल्या या दोन्ही नेत्यांनी भेट घेतली. मोदींनी या वेळी सांगितले, की भारत-अमेरिकेचे संबंध हे खऱ्या अर्थाने विश्वासार्ह आहेत. मानवजातीचे कल्याण आणि जागतिक शांतता-स्थैर्यासाठी ही मैत्री चांगली शक्ती म्हणून काम करेल.

या वेळी भारत-अमेरिकेदरम्यानच्या दीर्घकालीन लस कृती कार्यक्रमास २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. संयुक्त सैनिक दलांत भारताचा समावेश करण्याचे ‘व्हाइट हाउस’तर्फे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात आले. यात बहारीन हा सहयोगी सदस्य देश असेल. मोदींनी चर्चेदरम्यान अमेरिकेच्या कंपनींना ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ कार्यक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रात भारताशी भागीदारी करून येथे उत्पादने तयार करण्याचे आवाहन केले. उभय देशांत व्यापार आणि गुंतवणूक सातत्याने वाढत असली, तरी ती अद्याप अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे.

 भारतीय परराष्ट्र खात्याने सांगितले, की दोन्ही प्रमुखांची चर्चा ठोस मुद्दय़ांवर झाली व त्याची फलनिष्पत्ती दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ, गहिरे होण्याची प्रक्रिया गतिमान होईल. मोदींनी सांगितले, की भारत-अमेरिकेतील व्यूहात्मक भागीदारी ही खऱ्या अर्थाने विश्वासावर आधारलेली असून, सुरक्षेसह अनेक क्षेत्रांत दोन्ही देशांचे जिव्हाळय़ाचे विषय आणि समान मूल्यांमुळे हे नाते अधिक दृढविश्वासाचे झाले आहे. दोन्ही देशांच्या नागरिकांचे परस्पर संबंध व घनिष्ठ आर्थिक संबंधांमुळे या मैत्रीचे वेगळेपण अधोरेखित होते.

अन्न, इंधनाचा मुद्दा

या वेळी दोन्ही नेत्यांनी युक्रेन युद्धामुळे आलेल्या विस्कळीतपणातून मार्ग काढण्यासाठी परस्पर सहकार्य कसे करावे, विशेषत: दोन्ही देशांत भडकलेल्या अन्न व इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली. भारत-प्रशांत महासागरीय देशांच्या भागीदारीतून सागरी भागांतील परस्परहितांचे संरक्षण होत असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटीनंतर केलेल्या ‘ट्विट’मध्ये मोदींनी जाहीर केले, की ही भेट अगदी फलदायी ठरली. अत्यंत व्यापक स्तरावर आणि व्यापार, गुंतवणूक, संरक्षण व नागरी संबंधांसह विविधांगाने भारत-अमेरिका सहकार्यावर चर्चा झाली.

क्लिष्ट-अद्ययावत तंत्रज्ञानासाठी पुढाकार

या चर्चेनंतर फलनिष्पत्तीवर आधारित अधिक सुलभ सहकार्यासाठी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिवालय व अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या संयुक्त नेतृत्वाखाली क्लिष्ट व अद्ययावत तंत्रज्ञानासाठी पुढाकार घेण्याचे जाहीर करण्यात आले.

त्यात दोन्ही देशांत अधिक प्रभावी संपर्कयंत्रणा, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, ५ जी-६ जी तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, अवकाश आदी क्षेत्रांत सहकार्य केले जाईल. (चौकट २)  बायडेन यांच्याकडून मोदींची स्तुती एका वरिष्ठ मुत्सद्दी अधिकाऱ्याने सांगितले, की उभय नेत्यांत बंद दाराआड झालेल्या चर्चेत बायडेन यांनी मोदींनी कोविड साथ समर्थपणे व लोकशाही मार्गाने हाताळल्याबद्दल त्यांची स्तुती करत अभिनंदन केले. बायडेन यांनी चीनशी तुलना करता भारताचे हे यश उल्लेखनीय असल्याचे नमूद केले.