नवी दिल्ली : ‘‘भारत हा अमेरिकेचा विश्वासू भागीदार असून दोन्ही देशांमधील व्यापार करारासंबंधीची केवळ एक टक्का चर्चा शिल्लक आहे,’’ असे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच भारताबरोबरच्या द्विपक्षीय व्यापार करारावर दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी वाटाघाटी करत असून येत्या काही आठवड्यांत किंवा महिन्यांमध्ये त्यावर स्वाक्षर्या केल्या जातील, असे ते म्हणाले.
आयआयटी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘यूएस-इंडिया ट्रस्ट इनिशिएटिव्ह’ या कार्यक्रमात गोर बोलत होते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांचा नुकताच संपलेला भारत दौरा फलदायी ठरल्याचे गोर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘व्यापार कराराच्या अखेरच्या एक टक्का भागाला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारताने गेल्याच आठवड्यात वॉशिंग्टन डीसीला एक पथक पाठवले होते. ही चर्चा पुढे सुरू ठेवण्यासाठी पुढील आठवड्यात अमेरिकेचे पथक भारतात येत आहे.’’ अमेरिकेचे पथक १ ते ४ जूनदरम्यान भारत दौर्यावर येत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीही शुक्रवार याच प्रकारची टिप्पणी केली.
भारत-अमेरिका संबंधांचा विस्तार होण्याची अमर्याद क्षमता असल्याचे गोर म्हणाले. आता जगात भारताचे महत्त्व केवळ आर्थिकदृष्ट्या नाही तर सामरिकदृष्ट्या आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिका भेटीत स्थापन करण्यात आलेल्या ‘ट्रस्ट इनिशिएटिव्ह’मुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमिकंडक्टर, क्वांटम कम्प्युटिंग, जैवतंत्रज्ञान, ऊर्जा आणि अवकाश यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढण्यास मदत होत आहे,’’ अशी प्रशंसा गोर यांनी केली.
