‘अफगाणिस्तानातील माघारीनंतर भारत-अमेरिका सहकार्याची गरज’

गुप्तचर माहितीची देवाणघेवाण महत्त्वाची असून दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यात ते एकमेकांना मदत करू शकतात.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतल्यानंतर आता अमेरिका व भारत यांच्या सहकार्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय अमेरिकी काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी केले आहे.

ते म्हणाले, अमेरिकेने अफगाणिस्तानातील दहशतवाद विरोधी लढा थांबवू नये. कारण तसे केले तर अल कायदा व आयसिस यांना मोकळे रान मिळू शकते. भारत व अमेरिका हे अनेक मार्गांनी अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताळण्यासाठी एकमेकांना मदत करू शकतात. त्यात गुप्तचर माहितीची देवाणघेवाण महत्त्वाची असून दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यात ते एकमेकांना मदत करू शकतात.

तीन वेळा इलिनॉइसचे प्रतिनिधी असलेल्या कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे, की आपण दहशतवादाविरोधात प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत. भारत व अमेरिका तसेच मित्र देश व भागीदार यांनीही दहशतवाद हाणून पाडण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. वीस वर्षे संघर्षात घालवल्यानंतर तेथून सैन्य माघारी घेणे महत्त्वाचे होते.  असे असले तरी अमेरिकेने ज्या पद्धतीने माघार घेतली त्याची चौकशी झाली पाहिजे कारण ही परिस्थिती यापेक्षा चांगल्या पद्धतीने हाताळता आली असती. अमेरिकेने यानंतरही दहशतवाद विरोधी कारवाई अफगाणिस्तानात सुरू ठेवावी. आयसिस व अल कायदा यांना मोकळे रान देणे परवडणारे नाही. गुप्तचर समितीचा सदस्य या नात्याने मी असे सांगू इच्छितो की, अफगाणिस्तान हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान होणार नाही याची जबाबदारी तालिबान सरकार व अमेरिका यांच्यावर असणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India us co operation needed after afghanistan akp