US-India defense deal : भारत आपली हवाई सुरक्षा यंत्रणा सातत्याने आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी भारताकडून वेगवेगळे निर्णय घेतले जातात. आता भारत अमेरिकेकडून ‘जॅव्हेलिन’ अँटी-टँक क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या तयारीत आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय सैन्यांसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. यावर भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी प्रतिक्रिया देत दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांमधील हे मोठं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.
भारतीय लष्कराने अमेरिकेच्या फॉरेन मिलिटरी सेल्सच्या प्रक्रियेद्वारे जॅव्हेलिन हे अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी लेटर ऑफ ऑफर अँड ॲक्सेप्टन्सवर स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या मते या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक दृढ होण्यास मोठी मदत होईल. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
सर्जिओ गोर यांनी काय म्हटलं?
“जॅव्हेलिन ही युद्धात आपली क्षमता सिद्ध केलेली ‘अँटी-टँक’ (रणगाडा-विरोधी) प्रणाली भारत खरेदी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संरक्षण संबंधांमधील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. यामुळे संयुक्त उत्पादनाच्या शक्यता देखील निर्माण झाल्या आहेत. तसेच दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी मजबूत आणि सर्वोत्तम झाले आहे”, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी शुक्रवारी दिली आहे.
दरम्यान, जेव्हलिन हे एक पोर्टेबल रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे, जे टाक्या, चिलखती वाहने आणि बंकर नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
जेव्हलिन क्षेपणास्त्र प्रणालीचं महत्त्व काय?
जेव्हलिन अँटी-टँक गाईडेड मिसाइल (एटीजीएम) ही खांद्यावरून मारा करणारी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. भारताला देण्यात येणाऱ्या या क्षेपणास्त्रांचं मूल्य अंदाजे ४५.७ दशलक्ष डॉलर्स आहे आणि त्यात क्षेपणास्त्रे तसेच प्रक्षेपण युनिट्सचा समावेश आहे. यात FGM-१४८ क्षेपणास्त्रे, २५ जेव्हलिन लाइटवेट कमांड लॉन्च युनिट्स आदींचा समावेश आहे.
BIG news! India plans to buy the battle-tested Javelin anti-tank system. Just as @secwar highlighted at the May 2026 Shangri-La Dialogue, this is a great step forward in the U.S.-India defense relationship and opens the door to co-production possibilities. The engagement between…
— Ambassador Sergio Gor (@USAmbIndia) August 28, 2026
ही प्रणाली क्षेपणास्त्राच्या ‘फायर अँड फॉरगेट’ क्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याव्यतिरिक्त या करारात प्रशिक्षण, युद्धसराव आणि देखभालीस मदत करण्यासाठी आवश्यक असलेली अनेक ‘नॉन-मेजर डिफेन्स इक्विपमेंट’चा देखील समावेश असण्याची शक्यता आहे.
डीएससीएनुसार, यात स्किल्स ट्रेनर्स, सिम्युलेशनसाठी शस्त्रे, बॅटरी कूलंट युनिट्स, इलेक्ट्रॉनिक मॅन्युअल्स, ऑपरेटर मॅन्युअल्स, भौतिक सुरक्षा तपासणी घटक, तांत्रिक सहाय्य, टूल किट्स इत्यादी घटकांचा समावेश आहे. याचा अर्थ असा की, लष्कराच्या युनिट्सकडे क्षेपणास्त्रे आणि प्रक्षेपकांसह तैनातीसाठी आवश्यक असलेली देखभाल, प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधादेखील उपलब्ध असतील.
जेव्हलिन हे तिसऱ्या पिढीचे, खांद्यावरून डागता येणारे आणि माणसाद्वारे वाहून नेता येण्याजोगे मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे. याच्या ‘सॉफ्ट-लॉन्च’ यंत्रणेमुळे त्याला बंद जागेतूनही वापरता येते. यामध्ये असलेले ‘इमेजिंग-इन्फ्रारेड सीककर’ एकदा डागल्यानंतर लक्ष्याचा शोध घेण्यास सक्षम आहे, ज्यामुळे ऑपरेटरला लगेच सुरक्षित आश्रय घेता येतो. या क्षेपणास्त्राचा उपयोग बख्तरबंद वाहने, बंकर आणि घरांसह विस्तृत लक्ष्यांवर केला जाऊ शकतो.
