नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे त्यांना व्यापार करारात तडजोड करावी लागल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. हा करार अनेक महिन्यांपासून चर्चेत होता, मात्र तो रखडलेला असताना अचानक सोमवारी संध्याकाळी स्वाक्षरी करण्यात आल्या. त्यामागे ‘मोदींनाच माहीत असलेली कारणे’ असल्याचा टोला राहुल गांधींनी लगावला.

तसेच, इतक्या महत्त्वाच्या कराराची घोषणा केंद्र सरकारने न करता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ही बाब गंभीर आहे, अशी टीका विरोधकांनी केली. त्यावर अमेरिकेने आयातशुल्क कमी केले, म्हणून त्यांनीच याची घोषणा आधी केली, असे स्पष्टीकरण केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिले.

देशी बाजार पूर्ण खुला?

काँग्रेस पक्षाने या व्यापार करारावर चिंता व्यक्त केली. या कराराचे पूर्ण तपशील केंद्राने जाहीर करावेत व शेतकरी, व्यापारी व देशांतर्गत उद्योगांवर काय परिणाम होईल हेही स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेसने केली. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार भारत अमेरिकेच्या वस्तूवरील आयात शुल्क शून्यावर आणेल व इतर व्यापारी पूर्णपणे काढून टाकेल.

भारताने अमेरिकेच्या वस्तूंसाठी देशी बाजारपेठ पूर्णपणे खुली केली आहे का, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुले करण्याचा उल्लेख असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचे काय होणार, तसेच, भारत रशियाकडून तेलखरेदी पूर्णपणे थांबवेल, या ट्रम्प यांच्या दाव्यावर केंद्र सरकारने मौन का बाळगले आहे, अमेरिकेकडून जास्त वस्तू खरेदी झाल्यास ‘मेक इन इंडिया’ योजनेवर काय परिणाम होईल, असाही प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला.

अमेरिकेतील एप्स्टाइन फाइलमधून पुढे येऊ शकणारे खुलासे आणि उद्योजक गौतम अदानी यांच्याविरोधातील अमेरिकेतील खटला हीच पंतप्रधानांची खरी अडचण आहे. याच दबावामुळे मोदी सरकारने अमेरिका-भारत व्यापार करारावर घाईघाईने स्वाक्षरी केली. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा