Congress on India US Trade Deal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणार्‍या मालावरील टॅरिफमध्ये कपातीची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी कुठल्यातरी कारणाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर स्पष्टपणे दबावाखाली असल्याचे दिसून येते, असे म्हटले आहे. दरम्यान अमेरिका-भारत यांच्यातील व्यापार कराराची घोषणा ट्रम्प यांनी केल्याचा मुद्दा आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

जयराम रमेश नेमकं काय म्हणाले?

जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सोमवारी रात्री एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवल्याची घोषणा, रशिया आणि व्हेनेझुएला यांच्याकडून तेल खरेदीबाबतचे अपडेट आणि आता भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा हे तिन्ही अमेरिकेकडून करण्यात आल्याचा मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींना घेरण्यात आले आहे.

जयराम रमेश त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले की, “त्यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवण्याची घोषणा वॉशिंग्टन डीसीमधून केली. त्यांनी वॉशिंग्ट डीसीमधूनच रशिया आणि व्हेनेझुएलाकडून भारत करत असलेल्या तेल खरेदीबाबतचे अपडेटही जाहीर केले. आता त्यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणाही वॉशिंग्टनमधूनच केली आहे, ज्याची सविस्तर माहिती समोर येण्याची अद्याप वाट पाहिली जात आहे.”

पंतप्रधान मोदींवर टीक करत जयराम रमेश पुढे म्हणाले की, “पंतप्रधान मोदी कुठल्यातरी कारणामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर स्पष्टपणे दबावाखाली असल्याचे दिसतात, नेहमी घडणारे एकमेकांना आलिंगन देणे-मिठी मारणे तर दूरच, आता पंतप्रधान त्यांच्याबरोबर दिसले तरीही अस्वस्थ वाटू लागतात. असे वाटते की पंतप्रधान मोदींनी अखेर हार मानली आहे. ही नक्कीच ‘फादर ऑफ ऑल डील्स’ असू शकत नाही.वॉशिंग्टनमध्ये मात्र अगदी स्पष्टपणे ‘मोगॅम्बो खुश’ आहे.”

भारतीय मालावरील अमेरिकन टॅरिफ १८ टक्के

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालाच्या आयातीवर लावण्यात आलेले टॅरिफ २५ टक्क्यांहून कमी करून ते १८ टक्के करण्याची घोषणा केली आहे. ही माहिती ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर पोस्ट करत दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.