भारत-अमेरिका व्यापार करारामध्ये भारतीय शेतकर्यांच्या हिताशी कुठलीही तडजोड करण्यात आली नाही, अशी माहिती सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे, एनडीटीव्हीने यासंबंधीत वृत्त दिले आहे. तसेच ज्या देशांवर निर्बंध लादण्यात आलेले नाहीत अशा देशांकडून भारत तेलाची खरेदी करणे सुरू ठेवेल असेही सूत्रांनी सांगितले. महत्वाची बाब म्हणजे, अमेरिकेने निर्बंध लादलेल्या रशियाकडून तेल खरेदी करणारा भारत हा दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे.
अमेरिका आणि भारत यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीदरम्यान, भारताने राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेले कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुले करण्यास नकार दिला होता. दोन्ही देशांमध्ये या मुद्द्यावर दीर्घकाळ वाटाघाटी सुरू होत्या. सोयाबीन आणि दुग्धजन्य पदार्थांसारखे कृषी क्षेत्र खुले करण्यास भारताने नकार दिला होता. कृषी आणि दुग्धव्यवसाय याच्याशी संबंधित संवेदनशील क्षेत्र जे आत्तापर्यंत सुरक्षित ठेवण्यात आले होते, त्यांना यापुढेही संरक्षण कायम असणार आहे.
सुरूवातीच्या काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की भारताने या कराराचा भाग म्हणून काही कृषी उत्पादनांसाठी बाजारपेठ खुली करण्याची ऑफर दिली आहे. भारताने नुकतेच झालेल्या व्यापार करारांतर्गत युरोपियन युनियनला काही ठराविक कृषी उत्पादनांसाठी बाजारपेठ खुली केली आहे.
भारत-अमेरिका व्यापार करार
ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, भारत रशियाकडून तेलाची खरेदी थांबवेल आणि त्याऐवजी अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्याकडून तेल खरेदी करेल. याबदल्यात अमेरिका भारतीय मालावरील टॅरिफ सध्याच्या ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करेल.
ट्रम्प यांनी दंडात्मक कारवाई म्हणून भारतीय मालावर २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर देखील भारत रशियाकडून दररोज १.५ दशलक्ष बॅरल रशियन कच्चे तेल आयात करत आला आहे. ग्लोबल ट्रेड डेटा प्रोव्हायडर Kpler नुसार हे प्रमाण एकूण आयातीच्या एक तृतीअंश इतके आहे.
सरकारमधील सूत्रांनी सांगितले की, भारत दरांच्या आधारावर जगभरातील अशा देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवेल ज्यांच्यावर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत.
व्हेनेझुएलावर निर्बंध होते तेव्हा आपण त्यांच्याकडून खरेदी केली नाही. आता निर्बंध हटवले आहेत, तर आपण खरेदी करू, असे सूत्रांनी सांगितले. भारत हा आपल्या ऊर्जा खरेदीमध्ये त्याच्या नागरिकांना प्राधान्य देणे कायम ठेवेल असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
५०० अब्ज डॉलर्सचा व्यापार
ट्रम्प हे असेही म्हणाले आहेत की, व्यापार कराराचा भाग म्हणून भारताने अनेक उपाय योजना मान्य केल्या आहेत, ज्यामध्ये अमेरिकन मालावरील टॅरिफ शून्यावर आणणे आणि ५०० अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक किंमतीच्या अमेरिकन वस्तूंची खरेदी करणे अशा गोष्टींचा समावेश आहे.
याबद्दल बोलताना सूत्रांनी सांगितले की, या ५०० अब्ज डॉलर्सच्या आकड्यामध्ये विमान खरेदी करार आणि इतर गुंतवणुकींचा समावेश आहे.
“अमेरिकन वस्तू खरेदी करण्याच्या वचनबद्धतेमध्ये फार्मास्युटीकल्स, टेलिकॉम, संरक्षण, पेट्रोलियम आणि एअरक्राफ्ट अशा क्षेत्रांचा समावेश आहे. ही खरेदी येत्या काही वर्षांमध्ये केली जाईल,” असे एका अधिकाऱ्याने यापूर्वी रॉयटरशी बोलताना सांगितले होते.

