पीटीआय, नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातील बहुतेक मुद्द्यांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी सांगितले. आता केवळ काही किरकोळ मुद्दे, स्वल्पविराम आणि पूर्णविरामांवर दोन्ही देशांमधील चर्चा केंद्रित आहे, असे ते म्हणाले.

कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ भारतात आले असून ही चर्चा २ ते ४ जूनदरम्यान पार पडणार आहे. वाटाघाटी करणारे प्रमुख अमेरिकी अधिकारी ब्रेंडन लिंच हे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. यापूर्वी ३ फेब्रुवारी रोजी दोन्ही देशांनी व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यासाठी आराखडा जाहीर केला होता. मात्र, आयातशुल्काच्या मुद्द्यावर तेथील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांनंतर काही मुद्द्यांवर फेरविचार करणे भाग पडले आहे.

गोयल यांनी पत्रकारांना सांगितले की, “उर्वरित मुद्द्यांवर सहमती झाल्यानंतर झाल्यानंतर, आम्ही अमेरिकेबरोबर बीटीएच्या पहिल्या टप्प्याचा करार लवकरात लवकर पूर्ण करू आणि त्यावर स्वाक्षरी करू, असा मला पूर्ण विश्वास आहे. यानंतर अधिक व्यापक व्यापार करारावर पुढील चर्चा सुरू होईल.”

अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटल्याप्रमाणे, ९९ टक्के गोष्टी निश्चित झाल्या आहेत. आता फक्त लहान मुद्दे, स्वल्पविराम आणि पूर्णविरामांवर चर्चा सुरू आहे. करार अंतिम करताना, अमेरिकेत झालेले कायदेशीर बदल अंतिम करारात कसे प्रतिबिंबित होते आणि त्यानुसार कोणते बदल करावे लागतील, यावर विचार सुरू आहे.

  • पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री

भारत-ब्रिटन करारात पोलादाचा मुद्दा कळीचा

नवी दिल्ली : पोलाद आणि कार्बन सीमा समायोजन यंत्रणा (सीएबीएम) हे दोन मुद्दे भारत आणि ब्रिटनमदरम्यान व्यापार करारात कळीचे ठरले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही देशांदरम्यान या आठवड्यात चर्चा होणार असून पोलाद आणि सीएबीएमवर सहमतीसाठी प्रयत्न केले जातील, असे सूत्रांनी सांगितले. भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर २४ जुलै २०२५ रोजी स्वाक्षरी करण्यात आली होती.

भारत-ओमान करार अंमलात

नवी दिल्ली : भारत आणि ओमानदरम्यान करण्यात आलेला मुक्त व्यापार करार सोमवारपासून अंमलात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी दिली. भारत-ओमान सर्वंकष आर्थिक भागीदारी कराराचा (सीईपीए) वस्त्रोद्योग, चामडे, प्लास्टिक, सागरी उत्पादने, वाहन, क्रीडा साहित्य आणि कृषी उत्पादन यासारख्या क्षेत्रांमधील भारतीय निर्याददारांना लाभ होईल, असे गोयल यांनी सांगितले. या व्यापार करारावर गेल्या वर्षी १८ डिसेंबरला मस्कत येथे झालेल्या बैठकीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.