Key developments in India USA Trade Deal after PM Modi and Donald Trump’s high-level discussion : अमेरिकेबरोबर उच्च-स्तरीय व्यापार वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय अधिकार्‍यांचे एक शिष्टमंडळ वॉशिंग्टनला पाठवले जाणार आहे. दोन्ही देश अंतरिम द्विपक्षीय व्यापार कराराच्या आराखड्याला अंतिम रूप देण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शिष्टमंडळ अमेरिकेत जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जवळपास ४० मिनिटे फोनवरून चर्चा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घडामोड समोर आली आहे. पीटीआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारत-अमेरिका व्यापार कराराचा पहिल्या टप्प्याला आकार देण्यामध्ये ही आगामी चर्चा निर्णायक भूमिका बजावेल. या करारासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून वाटाघाटी केल्या जात आहेत.

अधिकाऱ्यांनी सूचित केले की, या बैठकीत रखडलेल्या मुद्द्यांची सोडवणूक करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल, विशेषतः अमेरिकेच्या टॅरिफ धोरणात नुकतेच करण्यात आलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होईल.

भारत आणि अमेरिका यांच्यातील या अंतरिम करारावर सुरुवातीला मार्च महिन्यात स्वाक्षरी केली जाणार होती. ज्यासाठी दोन्ही देशांचे प्रमु्ख वाटाघाटीकार हे फेब्रुवारी महिन्यात एकत्र येणार होते, तसेच या बैठकीत कराराच्या मसुद्याला अंतिम रूप दिले जाणार होते.मात्र अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर तेथील टॅरिफ स्ट्रक्चर बदलले यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २४ फेब्रुवारीपासून १५० दिवसांसाठी सर्वच देशांमधून होणाऱ्या आयातीवर १० टक्के टॅरिफ लादले. यामुळे जागतिक व्यापार क्षेत्रात मोठा बदल झाला असून, याचा परिणाम आधीच्या प्रस्तावात भारताला मिळालेल्या फायद्यावर देखील झाला.

आधी फेब्रुवारीच्या आराखड्यात अमेरिकेने भारतीय मालावरील टॅरिफ १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे मान्य केले होते. मात्र सर्व देशांवर एकसमान टॅरिफ लादल्याने आता स्पर्धेचे स्वरूप बदलले आहे.

दरम्यान फेररचना केलेल्या टॅरिफ रचनेबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे, गेल्या महिन्यात होणारी चर्चेची शेवटची फेरी पुढे ढकलण्यात आली होती.