Donald trump on US-India Trade relationship: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीच्या प्रचारात सध्या दंग आहेत. मंगळवारी प्रचारादरम्यान बोलत असताना त्यांनी भारतावर टीका केली. भारताची धोरणे ही दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधात अडसर ठरत असून भारताकडून गैरवर्तणूक होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. तसेच पुढच्या आठवड्यात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून या विषयावर चर्चा करू, असेही ते म्हणाले. मात्र ही भेट कुठे होणार आहे, याबाबत त्यांनी काही ठोस माहिती दिली नाही. ट्रम्प यांनी भारताच्या धोरणांवर टीका केली असली तरी मोदींचे मात्र त्यांनी कौतुक केले आहे.
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन २१ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपानच्या नेत्यांची शिखर परिषद आयोजित करत आहेत. आशिया खंडात चीनचा प्रभाव मोडीत काढून भारत स्वतःचे स्थान निर्माण करत आहे, अशी भावना अमेरिकेतील तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत.
गेल्या काही महिन्यात अनेक देशांच्या प्रतिनिधींनी अमेरिकेचा दौरा केला असून जो बायडेन यांची भेट घेतली आहे. तसेच या नेत्यांनी आपल्या देशात परतत असताना ट्रम्प यांचीही भेट घेतली. ५ नोव्हेंबर रोजी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सामना होणार आहे. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या असून त्यांच्यात आणि ट्रम्प यांच्यात कडवी स्पर्धा आहे.
पंतप्रधान मोदी २०१९ साली जेव्हा अमेरिकेत गेले होते. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले होते. टेक्सास येथील जाहीर सभेला ५० हजारांहून अधिक उपस्थितांची गर्दी जमलेली असताना ट्रम्प सर्वांसमोर ‘हाऊडी मोदी’ म्हणाले होते. मोदींनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते, माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांच्याशीही चांगले संबंध निर्माण केले होते. मागच्या वर्षी संरक्षण आणि वित्तीय क्षेत्राशी निगडित विविध सामंजस्य करार करण्यासाठी मोदी अमेरिकेत गेले असताना व्हाईट हाऊसने त्यांच्यासाठी लाल गालिचा अंथरला होता.