|| गौरव जोशी
भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामना पाहण्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत थाबूंनही प्रेक्षकांच्या पदरी निराशा पडली. काही प्रेक्षक दुपारी एक ते दोन या सुमारास स्टेडियममधून निघून गेले. मात्र जिद्दी व खरे क्रिकेटवेडे मोठय़ा फलकावर सामना अधिकृतपणे रद्द झाल्याचे स्पष्ट होईपर्यंत तळ ठोकून होते.
दुपारी साडेतीन वाजता जसे सामना रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले, तशी बऱ्याच चाहत्यांनी समालोचन आणि क्रिकेटपटू ज्या ठिकाणी बाहेर येणार होते तिकडे गर्दी केली. पैसे देऊनही सामन्याचा आनंद लुटता आला नसला तरी किमान खेळाडूंसोबत छायाचित्र तरी घेता यावे, या हेतूने चाहते धावले. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अॅलिस्टर कुक ‘बीबीसी’च्या समालोचन कक्षातून बाहेर पडताच जवळपास ६०-७० जण त्याच्यामागे ‘सेल्फी’ घेण्यासाठी धावले. पावसामुळे चाहते वाट पाहून वैतागले होते. सामन्याच्या तिकिटांचे पैसे ‘आयसीसी’कडून मिळतील, याची सर्वाना खात्री होती. मात्र तरीही आजी-माजी खेळाडूंसोबत छायाचित्र काढण्याची सुवर्णसंधी गमावू नये, यासाठी ते धडपड करत होते.
नॉटिंगहॅमपासून ४० मैल अंतरावर लिस्टर हे गाव वसले आहे. तिथे मोठय़ा प्रमाणात गुजराती भाषिक राहतात. भारताचा सामना पाहण्यासाठी जवळपास दोन हजार चाहते तिथून आले होते. पाऊस पडला त्याचे दु:ख तर होतेच, मात्र पुन्हा विश्वचषकातील सामना पाहण्याची संधी लाभणार का, या विचाराने चाहते अधिक निराश झाले होते. १९९९मध्ये म्हणजेच २० वर्षांपूर्वी इंग्लंडला अखेरचा विश्वचषक झाला होता. त्याशिवाय पावसामुळे रद्द होणाऱ्या सामन्यांना राखीव दिवस का नाही ठेवण्यात आला, असा प्रश्नही काही चाहत्यांनी उपस्थित केला. परंतु ‘आयसीसी’ने अशाप्रकारे राखीव दिवस ठेवल्यास विश्वचषक तीन महिन्यांपर्यंत लांबेल. काहींना हर्षां भोगले, कुक, मायकल वॉन यांच्यासह किमान छायाचित्र काढण्याचे भाग्य लाभल्यामुळे ते आनंदी दिसत होते, तर काहींनी सामना रद्द झाल्यावर पाऊस सुरू असतानाही चक्क सीमारेषा ओलांडत मैदान गाठले. मैदानातील कर्मचाऱ्यांनीही चाहत्यांच्या भावनांना समजून त्यांना प्रवेश नाकारला नाही.
भारत-न्यूझीलंड हे दोन्ही संघ आतापर्यंत विश्वचषकात एकाही सामन्यात पराभूत झालेले नव्हते. त्यामुळे वॉशिंग्टन डीसी, अमेरिका, स्कॉटलंड यांसारख्या देशांतूनसुद्धा चाहते सामन्याचा आस्वाद लुटण्यासाठी आले होते. त्यातीलच एका मराठी चाहता त्याच्याजवळ रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकिटसुद्धा असल्यामुळे आनंदीत होता. परंतु किमान तो सामना पावसामुळे वाया जाऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे.
सामना उशिराने सुरू होणार अथवा तो रद्द होण्याचीच शक्यता अधिक असतानासुद्धा भारतीय चाहत्यांच्या उत्साहात मात्र काडीचीही कमतरता नव्हती. ढोल-ताशे, झेंडे, भारतीय खेळाडूंचे नाव असलेले टी-शर्ट परिधान करून स्टेडियममध्ये भारतीय चाहते पसरले होते. तब्बल दोन दिवस नॉटिंगहॅमला पाऊस होता, तरीही चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. २०१५मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकात स्टेडियमची प्रेक्षकक्षमता किमान ६० ते ७० हजारांच्या आसपास होती, मात्र इंग्लंडमधील स्टेडियममध्ये फक्त १५ ते २० हजार प्रेक्षकच सामावू शकतात. त्यामुळे सामन्याच्या तिकिटांसाठी चाहते विविध ठिकाणी ओळखी वापरू पाहात होते. हाच जर भारत-श्रीलंका अथवा भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामना असता तर कदाचित चाहत्यांना फारसे वाईट वाटले नसते, मात्र भारत-न्यूझीलंड यांसारख्या तुल्यबळ संघांमधील सामना वाया गेल्यामुळे चाहत्यांना निराशा लपवता आली नाही. इंग्लंडमधील हवामानापुढे तुम्ही काहीही करू शकत नाही. येथे कधीही पाऊस येऊ शकतो. त्यामुळे आता १६ जून रोजी मँचेस्टरला रंगणाऱ्या भारत-पाकिस्तान द्वंद्वाची चाहते आतुरनेने वाट पाहात आहेत.