ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शेख रशीद यांनी भारत पाक सामन्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध पाकिस्तानचा विजय इस्लामचा विजय आहे असे विधान केले होते. टी-२० विश्वचषकात भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या विजयावर इस्लामचा विजय म्हणून आश्चर्य व्यक्त करत असदुद्दीन ओवेसी यांनी क्रिकेट सामन्याशी इस्लामचा काय संबंध आहे, असा प्रश्न केला. इम्रान सरकारमधील मंत्री शेख रशीद यांना वेडे ठरवून त्यांनी या शेजाऱ्यांना काहीच समजत नसल्याचे म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवेसी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “आपल्या शेजारी देशाचा एक मंत्री वेडा आहे बिचारा. पाकिस्तानचा विजय हा इस्लामचा विजय असल्याचे ते म्हणाले. पण शेजारील देशांना काही कळत नाही. शेवटी इस्लामचा क्रिकेट सामन्यांशी काय संबंध? अल्लाचे आभार माना की आमचे वडील तिथे (पाकिस्तान) गेले नाहीत, नाहीतर आम्हाला या वेड्यांना बघावे लागले असते,” असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

खराब फलंदाजी आणि खराब गोलंदाजीमुळे भारतीय संघाला रविवारी यूएई आणि ओमानमध्ये खेळवल्या जात असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पहिल्यांदाच विश्वचषकात भारताविरुद्धच्या विजयावर पाकिस्तानचे गृहमंत्री म्हणजेच गृहमंत्री शेख रशीद यांनी प्रतिक्रिया दिली होती. पाकिस्तानने पहिला टी-२० सामना दहा गडी राखून जिंकल्यानंतर भारतीय मुस्लिमांसह जगभरातील सर्व मुस्लिम आनंद साजरा करत आहेत. क्रिकेटचा उल्लेख युद्ध म्हणून करत त्यांनी भारताविरुद्धचा हा विजय संपूर्ण इस्लामचा विजय असल्याचे म्हणत जगभरातील मुस्लिमांना फतह मुबारक असे म्हटले.

‘मला खेद वाटतो की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा पहिला सामना आहे, जो मी माझ्या राष्ट्रीय जबाबदाऱ्यांमुळे मैदानावर पाहू शकलो नाही. पण मी इस्लामाबाद, रावळपिंडीकडे जाणार्‍या सर्व ट्रॅफिकला कंटेनर हटवण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरुन लोक उत्सव साजरा करू शकतील आणि पाकिस्तानच्या संघाचे, पाकिस्तानच्या जनतेचे अभिनंदन. आज आमचा अंतिम सामना होता. आज जगभरातील मुस्लिमांसह भारतातील मुस्लिमांच्या भावना पाकिस्तानी संघासोबत होत्या. तुम्हा सर्वांना सर्वशक्तिमान इस्लामच्या शुभेच्छा. पाकिस्तान झिंदाबाद….इस्लाम जिंदाबाद!’, असे गृहमंत्री शेख रशीद यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.