मुंबईत २००८ मध्ये झालेल्या हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक असलेला झाकी उर रहमान लख्वी याला पाकिस्तानने अटकेतून सोडून दिल्याच्या कृतीला भारताने संयुक्त राष्ट्रांच्या अल काईदा र्निबध समितीचे प्रमुख जिम मॅकले यांना पत्र पाठवून हरकत घेतल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रांनी हा प्रश्न पाकिस्तानपुढे मांडण्याचे ठरवले आहे. अलीकडेच लख्वी याला पाकिस्तानी न्यायालयाने ९ एप्रिलला सोडून दिले. लख्वीला सोडल्याने संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचा भंग झाल्याचे भारताचे संयुक्त राष्ट्रातील प्रमुख प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
लख्वी याला पाकिस्तानने सोडून दिल्यामुळे समितीच्या अल काईदा व इतर दहशतवादी संघटनांबाबत असलेल्या तरतुदींचा भंग झाल्याचेही भारताने या पत्रात नमूद केले आहे, लख्वी हा संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंधित यादीत नाव असलेला अतिरेकी असून त्याने जामिनासाठी भरलेले पैसे हाही र्निबधांचा भंग आहे.
दरम्यान मॅकले यांनी भारताच्या पत्राला प्रतिसाद दिला असून समितीच्या पुढच्या बैठकीत लख्वीचा प्रश्न चर्चेला घेतला जाईल असे म्हटले आहे. येत्या काही दिवसातच ही बैठक होत आहे. लख्वी याला पाकिस्तानने सोडून दिल्याबाबत भारताला वाटत असलेल्या चिंतेबाबत त्यांनी सहमती व्यक्त केली आहे.
समितीने लख्वी हा २००८ च्या हल्ल्यातील अतिरेकी असल्याने त्याच्यावर र्निबध घातले होते. त्याच्यावर शस्त्रास्त्र व प्रवास र्निबध व तसेच मालमत्ता गोठवणे ही कलमे लागू केलेली आहेत. समितीने म्हटले आहे की, र्निबधानंतर लष्कर ए तय्यबाचा कमांडर असलेल्या लख्वी याने त्याचे व्यवहार इराक व आग्नेय आशियात वळवले आहेत. गेल्या काही वर्षांत लष्कर ए तय्यबाच्या कारवायात लख्वीचा मोठा हात असून त्याला अल काईदाच्या संघटनांकडून पैसा मिळत आहे व तो अफगाणिस्तानात प्रशिक्षण छावण्या चालवित आहे, असे समितीच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. लख्वीला पाकिस्तानने सोडून दिल्याबाबत अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स व जर्मनी यांनी चिंता व्यक्त केली असून अमेरिकेने त्याच्या फेरअटकेची मागणी केली होती.
लख्वी याच्या व्यतिरिक्त मुंबईतील हल्ल्यात अब्दुल वाजिद, मझहर इक्बाल, हमद अमीन सादिक, शाहीद जमील रियाझ, जमील अहमद व युनूस अंजुम यांच्यावर नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईतील हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते.