भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीतील गैरव्यवहारांचा शोध घेणाऱया केंद्रीय अन्वेषण विभागाला कोणतीही माहिती देण्यास इटलीमधील न्यायालयाने नकार दिल्यानंतर आता या प्रकरणात एक पक्षकार म्हणून सहभागी होता येईल का, याची चाचपणी करण्यात येते आहे. सीबीआय आणि संरक्षण मंत्रालयाचे एक पथक इटलीला रवाना झाले आहे. तिथे गेल्यावर हिच शक्यता वास्तवात आणण्यासाठी हे पथक प्रयत्न करेल, असे सूत्रांकडून समजते.
ऑगस्टावेस्टलॅंडकडून १२ हेलिकॉप्टर खरेदी करताना मोठ्या प्रमाणात लाचखोरी झाल्याचे इटलीमध्ये झालेल्या तपासातून स्पष्ट झाले. भारतातील विविध लोकांना हा करार अस्तित्त्वात येण्यासाठी मोठी लाच देण्यात आली. माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती देण्यासाठी सीबीआय आणि संरक्षण मंत्रालयाचे एक पथक इटलीला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेलिकॉप्टर खरेदीतील लाचखोरीच्या तपासाची कागदपत्रे ही केवळ आरोपी, सरकारी पक्ष आणि वकिलांनाच उपलब्ध करून दिली जाऊ शकतात. तिसऱया व्यक्तीला ती देता येणार नाहीत, असे इटलीतील न्यायालयाने रोममधील भारताच्या दूतावासाला कळवले होते. हेलिकॉप्टर गैरव्यवहारात प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सीबीआयकडे नाहीत. त्यामुळेच त्यांचे एक पथक इटलीला रवाना झाले. मंगळवारी हे पथक रोममध्ये पोहोचेल. इटलीतील वकिलांना भेटून या प्रकरणात सीबीआयला एक पक्षकार म्हणून सहभागी होता येईल, याची चाचपणी करण्यात येणार आहे. पक्षकार म्हणून सहभागी झाल्यास खटल्याशी संबंधित कागदपत्रे मिळवता येतील आणि तपास पुढे नेता येईल, असा सीबीआयच्या अधिकाऱयांचा विचार आहे.