जगाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की भारत हा जगाच्या अर्थव्यवस्थेतील वेगवान देश आहे. जीडीपीद्वारे जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकडे भारताची वाटचाल सुरु आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दिल्लीतील भारत-कोरिया व्यापार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या पाठोपाठ केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनीही भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असून आपण लवकरच जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान मिळवू असेही म्हटले आहे.

भारत आणि कोरिया यांच्यात अनेक समानता आहेत. गौतम बुद्धांचे अनुयायी कोरियात आहेत तसेच ते भारतातही आहेत. बॉलिवूड असो किंवा साहित्यिक असोत दोन्ही देशांमध्ये या समानता दिसून येतात असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जगात असे अनेक देश आहेत ज्या देशांच्या अर्थव्यवस्थेत डेमोक्रेसी, डिमोग्राफी आणि डिमांड हे पाहायला मिळतात. भारतीय अर्थव्यवस्थेतही या तिन्ही गोष्टी आहेत याचा अभिमान वाटतो अशीही प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.

मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा कोरियाचा दौरा केला होता. त्यावेळी या देशाने केलेली प्रगती पाहून मी थक्क झालो होतो. कोरियाने जगभरात आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. आयटी, इलेक्ट्रॉनिक ते ऑटोमोबाईल क्षेत्रात कोरियाने केलेली प्रगती अनन्यसाधारण आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.